Monday, June 15, 2026 02:02:13 AM

Asha Bhosle : आशा भोसलेंना श्रद्धांजली वाहताना अथिया शेट्टीची घोडचूक! पोस्ट केला 'हा' फोटो; नेटकऱ्यांनी धरलं धारेवर

अथिया शेट्टीला तिची चूक लक्षात येताच तिने तात्काळ फोटो बदलला, परंतु तोपर्यंत तिच्या पोस्टचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

asha bhosle  आशा भोसलेंना श्रद्धांजली वाहताना अथिया शेट्टीची घोडचूक पोस्ट केला हा फोटो नेटकऱ्यांनी धरलं धारेवर

Athiya Shetty Big Mistake During Asha Bhosle Condolence Post : ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या निधनामुळे संपूर्ण देश शोकसागरात बुडालेला असताना, बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी एका गंभीर चुकीमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. 12 एप्रिल 2026 रोजी वयाच्या 92 व्या वर्षी आशाताईंनी जगाचा निरोप घेतला. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अथियाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. मात्र, घाईघाईत तिने आशा भोसले यांच्या ऐवजी त्यांच्या थोरल्या भगिनी, दिवंगत गायिका लता मंगेशकर यांचा फोटो पोस्ट केला. लता मंगेशकर यांचे निधन 6 फेब्रुवारी 2022 मध्ये झाले होते, तरीही अथियाने केलेल्या या चुकीमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.

नेटकऱ्यांचा संताप आणि ट्रोलिंगचा मारा
अथिया शेट्टीला तिची चूक लक्षात येताच तिने तात्काळ फोटो बदलला, परंतु तोपर्यंत तिच्या पोस्टचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. नेटकऱ्यांनी तिला 'डोकं नसलेली अभिनेत्री' म्हणत प्रचंड ट्रोल केले आहे. एका युजरने संताप व्यक्त करताना म्हटले की, "कोणताही संघर्ष न करता महान बनण्याची इच्छा असलेल्या या नेपो किड्सना साध्या गोष्टीही कळत नाहीत, म्हणूनच तिचे चित्रपट फ्लॉप ठरतात." दुसऱ्या एका युजरने "फोटो पोस्ट करण्यापूर्वी किमान एकदा बघून तरी घ्यायचे," असा सल्ला दिला, तर काहींनी तिला 'वेडी' ठरवत टीकेची झोड उठवली.

हेही वाचा - Asha Bhosle: 92 व्या वर्षीही 3 तास उभं राहून केलं होतं रेकॉर्डिंग; सुदीप बॅनर्जींनी आशा ताईंबद्दलचा सांगितला 'तो' शेवटचा अनुभव

काहीही स्पष्टीकरण न देता बदलली पोस्ट
या संपूर्ण वादावर अथिया शेट्टीने अद्याप अधिकृतपणे कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. तिने केवळ चुकीचा फोटो हटवून आशाताईंचा फोटो लावत आपली श्रद्धांजली पोस्ट दुरुस्त केली आहे. अथिया सध्या मोठ्या पडद्यापासून लांब असली तरी सोशल मीडियावर तिची मोठी फॅन फॉलोइंग आहे. मात्र, इतक्या संवेदनशील विषयावर अशा प्रकारची 'महाभयंकर' चूक झाल्याने तिचे चाहतेही नाराज झाले असून, ही चूक अक्षम्य असल्याचे बोलले जात आहे.

संगीत विश्वावर शोककळा
आशा भोसले यांच्या निधनानंतर मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख व्यक्त करत आहेत. आशाताईंचा प्रदीर्घ सांगीतिक प्रवास आणि त्यांचे योगदान अफाट आहे. अशा थोर व्यक्तिमत्त्वाचा फोटो ओळखण्यात झालेली ही चूक अभिनेत्रीसाठी चांगलीच महागात पडली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अथियाच्या या चुकीची आणि नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेची चर्चा रंगत आहे.

हेही वाचा - Asha Bhosale Death : आशाताईंना या गाण्यासाठी मिळाला फिल्मफेअर पुरस्कार, मात्र हे गाणं चित्रपटात कधी घेतलच नाही; काय आहे किस्सा? जाणून घ्या


सम्बन्धित सामग्री