‘कौन बनेगा करोडपती 17 ज्युनियर’ या लोकप्रिय कार्यक्रमात हॉटसीटवर बसलेला 10 वर्षांचा इशित भट्ट प्रेक्षकांच्या नजरेत रातोरात आला. पण या चर्चेचे कारण त्याचा खेळ नव्हता, तर अमिताभ बच्चन यांच्याशी केलेलं त्याचं उद्धट वर्तन होतं. या घटनेनंतर सोशल मीडियावर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली, अनेकांनी त्याच्या पालकांच्या संस्कारांवर प्रश्न उपस्थित केले. मात्र,आता इशितने स्वतःच माफी मागत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
गुजरातमधील इशित ‘केबीसी ज्युनियर’च्या हॉटसीटवर आला तेव्हा सुरुवातीला सर्वांना वाटलं की तो आत्मविश्वासू आणि उत्साही आहे. पण थोड्याच वेळात त्याचा तो आत्मविश्वास उद्धटपणात बदलला. अमिताभ बच्चन प्रश्न विचारत असतानाच तो मध्येच बोलत होता, उत्तर देताना "सर, हे लवकर लॉक करा" असं म्हणत होता, तर काहीवेळा “मला नियम सांगायची गरज नाही, मला सगळं माहित आहे” असंही म्हणाला. त्याच्या या वर्तनामुळे प्रेक्षक नाराज झाले आणि ट्विटर, इन्स्टाग्रामवर त्याच्यावर टीकेचा वर्षाव झाला.
हेही वाचा : Actor Asrani Passes Away: ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते गोवर्धन असरानी यांचे निधन; 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
या टीकेनंतर इशित भट्टने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक भावनिक व्हिडीओ शेअर केलाय. त्या व्हिडीओमध्ये तो म्हणतो, “सर्वांना नमस्कार, ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये माझ्या वागण्यामुळे अनेक लोक नाराज झाले, त्याबद्दल मी मनापासून माफी मागतो. माझा बच्चन सरांचा अनादर करण्याचा हेतू नव्हता. मी त्या क्षणी खूप घाबरलो होतो, स्टेजवर कॅमेऱ्यांसमोर पहिल्यांदाच बसलो होतो आणि नकळत माझ्या तोंडून काही गोष्टी बाहेर पडल्या. मी अमिताभ बच्चन सरांचा आणि ‘केबीसी’ टीमचा मनापासून आदर करतो.”
तो पुढे म्हणतो, “या अनुभवातून मला एक मोठा धडा मिळाला आहे आपले शब्द आणि वर्तन आपलं व्यक्तिमत्त्व ठरवत असतं." आता मी भविष्यात अधिक विनम्र, आदरयुक्त आणि संयमी राहण्याचा प्रयत्न करीन. ज्यांनी मला समजून घेतलं आणि या चुका दुरुस्त करण्याची संधी दिली, त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो.”
इशितच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी लिहिलंय, “माफी मागायला धैर्य लागतं,” तर काहींनी म्हटलं, “चुका होतात, पण त्यातून शिकणं महत्त्वाचं आहे.” काही सेलिब्रिटींनीही इशितच्या माफीनाम्याचं समर्थन करत त्याला प्रोत्साहन दिलं की, “असं अनुभवातून शिकूनच व्यक्तिमत्त्व घडतं.”
अमिताभ बच्चन यांनी याबाबत अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसली तरी, सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांनी इशितला माफ करण्याचं आवाहन केलं आहे. अखेरीस, या घटनेने एका लहान मुलाला विनम्रतेचा आणि आदराचा अमूल्य धडा शिकवला, आणि प्रेक्षकांनाही स्मरण करून दिलं की मंच कितीही मोठा असला तरी, नम्रता हीच खऱ्या व्यक्तिमत्त्वाची ओळख असते.
हेही वाचा : Govardhan Asrani Death: ही होती असरानी यांची शेवटची इच्छा; मृत्यूपूर्वीच पत्नीला दिल्या होत्या या खास सूचना...