‘आमने-सामने’ नाटकातून काढल्यानंतर कलाकार-निर्मात्यांमध्ये वार-पलटवार, अखेर रोहन आणि केतकीने सांगितले; ‘आमच्या बाजूने पूर्णविराम’

केतकी आणि रोहन यांनी नवीन व्हिडीओ जारी करत या वादाला पूर्णविराम दिला असला, तरी त्यांनी निर्मात्यांच्या दाव्यांमधील अनेक त्रुटी आणि वास्तव प्रेक्षकांसमोर आणले आहे

‘आमने-सामने’ नाटकातून काढल्यानंतर कलाकार-निर्मात्यांमध्ये वार-पलटवार, अखेर रोहन आणि केतकीने सांगितले; ‘आमच्या बाजूने पूर्णविराम’
Ketaki Palav, Rohan Gujar

‘आमने-सामने’ या लोकप्रिय नाटकाच्या सेटवरील वाद दिवसेंदिवस नवीन वळण घेत असून, अभिनेत्री केतकी पालव आणि अभिनेता रोहन गुजर यांनी या वादावर पुन्हा एकदा आपली बाजू मांडली आहे. नाटकाचे निर्माते लीना भागवत आणि मंगेश कदम यांनी यापूर्वी व्हिडीओ शेअर करत कलाकारांवर वारंवार मानधनवाढ मागितल्याचा आरोप केला होता. त्यानंतर केतकी आणि रोहन यांनी नवीन व्हिडीओ जारी करत या वादाला पूर्णविराम दिला असला, तरी त्यांनी निर्मात्यांच्या दाव्यांमधील अनेक त्रुटी आणि वास्तव प्रेक्षकांसमोर आणले आहे.

आठ वर्षांतील मानधनवाढीचे गणित आणि वास्तव

निर्मात्यांच्या वक्तव्यामुळे प्रेक्षकांमध्ये असा गैरसमज पसरला की कलाकारांनी अवघ्या एका वर्षात तीन वेळा मानधनवाढ मागितली, मात्र हे पूर्णपणे चुकीचे असल्याचे केतकी आणि रोहन यांनी स्पष्ट केले. प्रत्यक्षात हा संपूर्ण काळ तब्बल 8 वर्षांचा आहे. कलाकारांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची पहिली मानधनवाढ 4 वर्षांनंतर झाली होती, जी अत्यंत किरकोळ स्वरूपात होती. त्यानंतर दुसरी मानधनवाढ 6 वर्षांनंतर मागण्यात आली. या कालावधीत एकदा त्यांचे नाटक बंदही पडले होते आणि नंतर पुन्हा नवीन जोमाने सुरू झाले होते. नाटकाचे प्रयोग हाऊसफुल झाल्यानंतरच त्यांनी नियमानुसार मानधनवाढीचा प्रस्ताव मांडल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – ‘आमने-सामने’ वादावर लीना भागवत आणि मंगेश कदम यांचं प्रत्युत्तर; म्हणाले, ‘नाण्याची दुसरी बाजू’

निर्मात्यांच्या सहमतीवर आणि मेसेजवरील खुलासे

केतकी आणि रोहन यांनी त्यांच्याकडे असलेल्या व्हॉट्सॲप मेसेजचा दाखला देत निर्मात्यांचे दावे खोडून काढले. निर्मात्यांनी आमच्या मागण्या सहज मान्य केल्या, हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. निर्मात्यांनी स्वतः मेसेजमध्ये “स्वतःला मुरड घालून आणि मना विरुद्ध मी ही वाढ करत आहे,” असे लिहिले होते. याचा अर्थ ही मानधनवाढ निर्मात्यांनी मनापासून केलीच नव्हती, असा आरोप कलाकारांनी केला. तसेच, गेल्या 8 वर्षांच्या काळात नाटकाचे बुकिंग उत्तम आणि हाऊसफुल होत असतानाही निर्मात्यांनी कधीही स्वतःहून कलाकारांच्या मानधनात वाढ करण्याचा विचार केला नव्हता, असेही त्यांनी निदर्शनास आणले.

संकटाच्या काळात दिलेली साथ आणि तडकाफडकी रिप्लेसमेंट

गेल्या 7 ते 8 वर्षांपासून या नाटकाशी इमानेइतबारे जोडले गेलेले हे कलाकार संकटाच्या काळात पूर्णपणे पाठीशी उभे राहिले होते. कोरोना काळातील लॉकडाऊनच्या काळात जेव्हा प्रयोग केवळ 50 टक्के प्रेक्षकक्षमतेवर सुरू होते, तेव्हा निर्मात्यांच्या विनंतीवरून कलाकारांनी तब्बल 50 टक्के कमी पाकीट घेऊन काम केले होते. अशा कठीण प्रसंगी पूर्ण निष्ठा दाखवल्यानंतर, केवळ काही रुपयांच्या मानधनवाढीच्या कारणावरून कोणतीही पूर्वकल्पना न देता तडकाफडकी काढून टाकण्यात आल्याचे दुःख त्यांनी व्यक्त केले. नाटकाचे चांगले दिवस आल्यावर अशा पद्धतीने बाजूला केल्यामुळे मनाला तीव्र वेदना झाल्याचे सांगत, आता हा विषय इथेच संपवत असल्याचे या दोन्ही कलाकारांनी स्पष्ट केले आहे.

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number