मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि राजकीय घराण्यांचे नाते अनेकदा चर्चेत असते. अशाच एका नव्या नात्याची चर्चा सध्या मराठी मनोरंजन विश्वात रंगत आहे. अभिनेत्री तेजस्विनी लोणारी लवकरच शिवसेना पक्षाचे युवा नेते समाधान सरवणकर यांच्याशी विवाहबंधनात अडकणार असल्याची अधिकृत पुष्टी मिळाली आहे.
समाधान सरवणकर हे शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार सदा सरवणकर यांचे सुपुत्र आहेत. नुकताच तेजस्विनी आणि समाधान यांचा साखरपुडा पार पडला असून, दोघांच्या आयुष्यातील हा खास क्षण अतिशय मर्यादित पाहुण्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
मुंबईतील सेंट रेगीस या आलिशान पंचतारांकित हॉटेलमध्ये साखरपुडा समारंभ पार पडला. कुटुंबीय आणि काही निवडक मित्रमंडळ एवढ्याच जणांसमोर झालेल्या या कार्यक्रमाचे फोटो आणि माहिती आता बाहेर येत असून चाहत्यांकडून दोघांना शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.
हेही वाचा: Matheran Mini Train: 1 नोव्हेंबरपासून माथेरान मिनी ट्रेन पुन्हा धावणार; पर्यटकांनो! अनुभवा हिरवाईतील रम्य सफर
तेजस्विनी लोणारीने ‘नो प्रॉब्लेम’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर 'चित्तौड़ की रानी पद्मिनी का जोहर' या मालिकेत पद्मिनीची भूमिका साकारत तिने हिंदी टेलिव्हिजनमध्येही ठसा उमटवला. मात्र तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती ‘बिग बॉस मराठी 4’ या शोमधून.
समाधान सरवणकर आणि तेजस्विनी लोणारी यांच्या साखरपुड्याला मराठी सिनेसृष्टीतील अनेक नामांकित कलाकारांनी उपस्थित राहून दोघांचे अभिनंदन केले. मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव, अभिनेत्री पूजा सावंत आणि अभिजीत खांडकेकर यांनीही या समारंभात हजेरी लावल्याचे समजते.
या नव्या जोडीच्या लग्नाची तारीख अद्याप निश्चित झालेली नसली, तरी लवकरच ती जाहीर होण्याची शक्यता आहे. सध्या मात्र मराठी मनोरंजन आणि राजकीय क्षेत्रात या साखरपुड्याची जोरदार चर्चा रंगत आहे.
हेही वाचा: Madras High Court: मद्रास उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय: क्रिप्टोकरन्सीला कायद्याने मालमत्तेचा दर्जा