दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहेत. नुकतेच हे दोघे प्रसिद्ध चित्रपट निर्माते करण जोहरच्या लोकप्रिय ‘कॉफी विथ करण 9’ (Koffee With Karan 9) या चॅट शोमध्ये पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. या मंचावर त्यांनी आपल्या प्रेमप्रकरणापासून अगदी वैवाहिक प्रवासापर्यंतच्या अनेक गोष्टी मोकळेपणाने मांडल्या. परंतु, या शोमधील काही विधानांमुळे अभिनेत्याला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला असून, नेटकऱ्यांनी त्याच्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
‘कॉफी विथ करण 9’ मधील खुलासे
या शो दरम्यान विजय आणि रश्मिकाच्या नात्याबाबत अनेक रंजक प्रश्न विचारण्यात आले, ज्यामध्ये रश्मिकानेच विजयला विवाहासाठी विचारल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला. त्यावर बोलताना विजयने सांगितले की, रश्मिकाने तब्बल 100 पेक्षा जास्त वेळा लग्नाचा विषय काढला होता. शोमधील हाच भाग सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला. मात्र, या संवादावर अनेकांनी आक्षेप घेतला. विजयची बोलण्याची शैली रश्मिकाला कमी लेखणारी असल्याचे सांगत काहींनी त्याला ‘अहंकारी’ ठरवले. विशेष म्हणजे, शोमध्ये विजय सोफ्यावर कसा बसला होता, त्याच्या हातात कॉफीचा कप होता पण रश्मिकासमोर का नव्हता, या अत्यंत क्षुल्लक गोष्टींवरूनही नेटकऱ्यांनी त्याचा चांगलाच समाचार घेतला आणि काहींनी त्याला थेट ‘रेड फ्लॅग’ (Red Flag) अर्थात नात्यासाठी अयोग्य जोडीदार म्हणून हिणवले.
ट्रोलिंगला थेट उत्तर देण्याऐवजी विजयचा भन्नाट उपरोधिक टोला
सोशल मीडियावर सुरु असलेल्या या उलट-सुलट चर्चेवर आणि अतिविश्लेषणावर विजयने अत्यंत हटके शैलीत प्रतिक्रिया दिली आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्यंगात्मक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये दोन कंटेंट क्रिएटर्स ‘कॉफी विथ करण’मधील त्यांच्या संवादाची खिल्ली उडवताना दिसत आहेत. विजयच्या बसण्याच्या पद्धतीपासून ते अगदी कॉफीच्या कपपर्यंत प्रत्येक छोट्या गोष्टीत नकारात्मक अर्थ शोधणाऱ्या ट्रोल्सवर या व्हिडिओमधून चांगलाच निशाणा साधण्यात आला आहे. तसेच रश्मिकाला इन्स्टाग्रामवर फॉलो न करण्याच्या मुद्द्यावरून होणाऱ्या टीकेचीही याद्वारे फिरकी घेण्यात आली आहे.
हेही वाचा – सलमान, अक्षय, बिग बींसह आमिर खानही होता शूटर्सच्या निशाण्यावर; 3 वेळा घराची रेकी, मात्र ऐनवेळी प्लॅन बदलला
हा उपरोधिक व्हिडिओ शेअर करताना विजयने त्यावर ‘Needs subtitles. Regional languages lo’ अशी मजेशीर कॅप्शन दिली आहे. सेलिब्रिटींच्या साध्या-साध्या कृतींचा विनाकारण बाऊ करून त्यामागे चुकीचे अर्थ काढणाऱ्या लोकांची त्याने या माध्यमातून अप्रत्यक्षपणे खिल्ली उडवली आहे. दरम्यान, गतवर्षी २६ फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकलेल्या या जोडीची प्रेमकहाणी ‘गीता गोविंदम’ आणि ‘डियर कॉम्रेड’ चित्रपटांच्या सेटपासून सुरू झाली होती. लग्नानंतर आपल्या नात्याचा नवा अध्याय सुरू करणाऱ्या या जोडीला ट्रोल करणाऱ्यांना विजयने दिलेल्या या भन्नाट प्रत्युत्तराची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.