Saturday, March 07, 2026 02:21:58 AM

Sanjay Raut: 'हा सामना म्हणजे भाजपचा खेळ अन् सेटिंग...' भारत-पाकिस्तान सामन्यावरून संजय राऊतांची बोचरी टीका

राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर दुहेरी भूमिका घेतल्याचा दावा त्यांनी केला असून या वक्तव्यामुळे राजकीय वादंग निर्माण झाला आहे. भाजपकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

sanjay raut हा सामना म्हणजे भाजपचा खेळ अन् सेटिंग भारत-पाकिस्तान सामन्यावरून संजय राऊतांची बोचरी टीका

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना म्हणजे केवळ मैदानातील दोन संघांमधील लढत नसून तो चाहत्यांसाठी एक भावनिक सोहळा असतो. मात्र, कोलंबो येथे होणाऱ्या या हाय व्होल्टेज सामन्यापूर्वीच देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनी या सामन्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षावर शब्दांच्या फैरी झाडल्या आहेत. "हा सामना म्हणजे क्रिकेट नसून भाजपचा सट्टेबाजीचा एक सुनियोजित खेळ आहे," अशा बोचऱ्या शब्दांत राऊतांनी सत्ताधाऱ्यांच्या 'राष्ट्रवादा'वरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

एकीकडे टिपू सुलतानच्या मुद्द्यावरून हिंदुत्वाचे राजकारण करायचे आणि दुसरीकडे पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळून सट्टेबाजीच्या माध्यमातून हजारो कोटींची माया जमवायची, असा दुटप्पी चेहरा भाजपचा उघड झाला असल्याची टीका राऊत यांनी केली. "निवडणुका आल्या की यांना भारत-पाकिस्तान, हिंदू-मुसलमान आणि राष्ट्रभक्तीची आठवण येते.

मतांच्या जोगव्यासाठी पाकिस्तानवर बहिष्कार टाकण्याच्या गप्पा मारल्या जातात, पण जेव्हा पैशांचा, बेटींगचा आणि 'सेटिंग'चा विषय येतो, तेव्हा जय शाहांच्या नेतृत्वाखालील बीसीसीआयला हे सामने खेळायला कशी परवानगी मिळते?" असा रोखठोक सवाल त्यांनी पत्रकार परिषदेत विचारला.

हेही वाचा: Akola Crime : दुचाकीवरून आला अन् दोन शाळकरी मुलीच्या..., CCTV मध्ये 'तो' प्रकार कैद; अकोल्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

संजय राऊत यांनी यावेळी सट्टेबाजीच्या आकडेवारीचा हवाला देत खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या मते, मागील सामन्यात सट्टेबाजीच्या माध्यमातून पाकिस्तानला तब्बल 25 हजार कोटी रुपये गेले आहेत. "माझ्याकडे सरकारपेक्षा जास्त माहिती आहे. या सट्टेबाजीतील काही वाटा सरकारमधील बड्या धेंडांपर्यंत पोहोचतो," असा गंभीर आरोपही त्यांनी केला. हाच पैसा पुढे पुलवामा आणि पहलगाम सारख्या संवेदनशील भागांत दहशतवादी कारवायांसाठी वापरला जातो, असे सांगत त्यांनी भाजपच्या 'राष्ट्रवादा'चा बुरखा फाडण्याचा प्रयत्न केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना राऊत म्हणाले की, "कालच फडणवीसांनी टिपू सुलतानच्या क्रूरकर्मा असण्यावर भाष्य केले. पाकिस्तानमध्ये टिपू सुलतानला हिरो मानले जाते. मग ज्या देशाचे विचार तुम्हाला मान्य नाहीत, त्या देशासोबत क्रिकेट खेळताना तुमचा स्वाभिमान कुठे जातो? जर टिपू सुलतानच्या नावाने राजकारण करायचे असेल, तर फडणवीसांनी या सामन्याचा धिक्कार करायला हवा होता. मात्र, जिथे शेकडो कोटींच्या नफ्याचा विषय येतो, तिथे भाजपचे नेते मौन बाळगतात, कारण हे सर्व 'ढोंगी' आहेत."

एकूणच, भारत-पाकिस्तान सामन्याच्या निमित्ताने सुरू झालेल्या या राजकीय कलगीतुऱ्याने क्रीडाविश्वातही खळबळ माजली आहे. "भाजपचा एकही नेता पाकिस्तानसोबत खेळू नका, असे ठामपणे सांगण्याचे धाडस दाखवत नाही," असे म्हणत राऊतांनी भाजपच्या रणनीतीवर शंका उपस्थित केली आहे. आता राऊतांच्या या 'सट्टेबाजी' आणि 'दहशतवादी फंड' या आरोपांना भाजप काय प्रत्युत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: Kasara Manmad Railway Line: कसारा-मनमाड रेल्वे प्रवाशांसाठी 'गुड न्यूज'; तिसऱ्या-चौथ्या लाईनला हिरवा कंदील, प्रवास होणार सुखकर


सम्बन्धित सामग्री