Thursday, February 12, 2026 02:58:24 PM

Pune Railway Time Table: रेल्वेप्रवास करणाऱ्यांसाठी 'बॅड न्यूज'; 'या' रेल्वेगाड्या आता हडपसर स्टेशनलाच थांबणार कारण काय?

26 जानेवारीपासून लागू होणाऱ्या या निर्णयामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता असून, प्रवासी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

pune railway time table  रेल्वेप्रवास करणाऱ्यांसाठी बॅड न्यूज या रेल्वेगाड्या आता हडपसर स्टेशनलाच थांबणार कारण काय

पुणे: विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात दररोज हजारो प्रवासी कामानिमित्त येत असतात. मात्र, आता मराठवाड्यातून पुण्याला येणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने मोठा ‘खो’ घातला आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार, दोन महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांच्या टर्मिनसमध्ये बदल करण्यात आला असून, आता या गाड्या पुणे स्टेशनऐवजी हडपसर स्थानकावरच आपला प्रवास संपवणार आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर म्हणजेच 26 जानेवारीपासून हा नवा नियम लागू होत आहे.

कोणत्या गाड्यांच्या प्रवासात होणार बदल?

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 17630 हुजूर साहिब नांदेड - पुणे एक्स्प्रेस आणि पुणे - हरंगुळ (लातूर) - पुणे एक्स्प्रेस या दोन प्रमुख गाड्यांच्या टर्मिनसमध्ये हा बदल करण्यात आला आहे. आता नांदेडपुणे एक्स्प्रेस पुण्याऐवजी हडपसर स्थानकावर पहाटे चार वाजून 35 मिनिटांनी दाखल होणार आहे. पुणे मुख्य स्थानकावरील वाढती गर्दी आणि तांत्रिक कामांचा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.

हेही वाचा: Padma Awards: पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री यामध्ये काय आहे फरक? जाणून घ्या पुरस्कारांची पूर्ण माहिती

प्रवाशांची गैरसोय वाढली

गाडी पहाटे साडेचार वाजता हडपसरला येणार असली, तरी तिथून पुढे शहरात जाण्यासाठी प्रवाशांसमोर मोठा यक्षप्रश्न उभा राहिला आहे. पहाटेच्या वेळी हडपसर स्थानकावर पीएमपीएल बससेवा उपलब्ध नसते. परिणामी, प्रवाशांना रिक्षा किंवा खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागणार आहे. यामुळे प्रवाशांच्या खिशाला ‘कात्री’ लागण्याची दाट शक्यता असून, रिक्षाचालकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जाण्याची भीती प्रवासी संघटनांनी व्यक्त केली आहे.

डेमूची सोय, पण ताटकळत बसण्याची वेळ

प्रवाशांच्या सोयीसाठी हडपसर ते पुणे स्टेशनदरम्यान सोलापूर - पुणे डेमू (11422) गाडी उपलब्ध असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ही डेमू ट्रेन हडपसरहून सकाळी पाच वाजून 25 मिनिटांनी  सुटते. मात्र, नांदेड एक्स्प्रेसमधून उतरलेल्या प्रवाशांना किमान एक तास स्थानकावर ताटकळत बसावे लागणार आहे. “आधीच रात्रीचा प्रवास, त्यात पहाटेची थंडी आणि वरून तासाभराची प्रतीक्षा, हा तर प्रवाशांचा छळच आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया अनेक प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

प्रवासी संघटना आक्रमक, आंदोलनाचा इशारा

रेल्वेच्या या ‘एकतर्फी’ निर्णयामुळे प्रवासी संघटनांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि नोकरदारांसाठी हडपसर स्थानक सोयीचे नसून, यामुळे वेळ आणि पैसा दोन्हीचा अपव्यय होणार असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. काही प्रवासी संघटनांनी या निर्णयाला कडाडून विरोध करत आंदोलनाचा इशाराही दिला आहे. रेल्वे प्रशासनाने केवळ स्थानकावरील ताण कमी करण्यापुरता विचार न करता, प्रवाशांच्या सुरक्षितता आणि सोयीचाही गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

हेही वाचा: Pandharpur Vithhal Temple: प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरी सजली, विठ्ठल मंदिरात आकर्षक तिरंगी फुलांची आरास


सम्बन्धित सामग्री