लोकप्रिय मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपमध्ये सध्या एक असा मोठा बदल होत आहे, जो कदाचित अनेक युजर्सच्या पटकन लक्षातही येणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, 'मेटा' (Meta) कंपनी आता व्हॉट्सॲपमधून 'अवतार' (Avatar) हे वैशिष्ट्य हळूहळू पूर्णपणे हटवत आहे. हा बदल अँड्रॉइड आणि आयओएस (iOS) अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर टप्प्याटप्प्याने लागू केला जात असून, येत्या काही दिवसांत हे फीचर सर्व युजर्सच्या फोनमधून गायब होण्याची शक्यता आहे.
या वैशिष्ट्याद्वारे युजर्स स्वतःसारखा दिसणारा एक 'डिजिटल कॅरेक्टर' म्हणजेच अवतार तयार करू शकत होते. यामध्ये चेहऱ्याची ठेवण, केसांची रचना, कपडे आणि विविध कस्टमायझेशनचे पर्याय उपलब्ध होते. हा अवतार युजर्सना प्रोफाईल फोटो म्हणून ठेवता येत होता, तसेच चॅटिंग दरम्यान स्टिकर्सच्या रूपातही त्याचा वापर करता येत होता. मेटाने वेळोवेळी यामध्ये ॲनिमेशन आणि ड्युअल-प्रोफाईल सारखे प्रगत पर्याय देऊन युजरचा अनुभव अधिक चांगला करण्याचा प्रयत्न केला होता.
नव्या अपडेटनुसार, आता युजर्सना नवीन अवतार तयार करता येणार नाहीत किंवा जुन्या अवतारात कोणतेही बदल (Edit) करता येणार नाहीत. व्हॉट्सॲपच्या सेटिंग्ज, चॅट इन्फो आणि कीबोर्डमधूनही हे ऑप्शन्स आता हटवले जात आहेत. काही युजर्सना आधीच 'अवतार एडिटिंग आता उपलब्ध नाही' अशा आशयाचे नोटिफिकेशन मिळू लागले आहे. अनेक युजर्सच्या फोनमधून तर संपूर्ण अवतार विभागच गायब झाला असून, ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असल्याचे स्पष्ट होत आहे.
ज्या युजर्सनी यापूर्वी स्वतःचे अवतार स्टिकर्स वापरले आहेत, त्यांच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. जुने स्टिकर्स लगेच गायब होणार नाहीत. तुम्ही तुमच्या 'फेव्हरेट' किंवा 'रिसेंट' स्टिकर्सच्या यादीतून त्यांचा वापर करू शकाल. मात्र, भविष्यात कीबोर्डवरून नवीन अवतार एक्सेस करणे किंवा नवीन स्टिकर्स तयार करणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य होणार आहे. हे फिचर टप्प्याटप्प्याने रोलआउट होत असल्याने, काही युजर्सना ते अजूनही दिसत असू शकते, परंतु लवकरच ते पूर्णपणे बंद होईल.
हेही वाचा: Tamil Nadu Politics : तमिळनाडूत विजय यांचा टीव्हीके आणि काँग्रेसचे नवे समीकरण? भडकलेल्या डीएमकेचा काँग्रेसवर विश्वासघाताचा आरोप
मेटाने का घेतला हा निर्णय?
या फिचरला निरोप देण्यामागे मेटाने अद्याप कोणतेही अधिकृत कारण स्पष्ट केलेले नाही. मात्र, तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, या फिचरला युजर्सकडून अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला नाही. आजही बहुतेक युजर्स स्वतःचा खरा फोटो, इमोजी किंवा साधे स्टिकर्स वापरण्यालाच जास्त पसंती देतात. ज्या फिचरचा वापर कमी होतो, असे फिचर काढून ॲप अधिक 'लाईट' आणि कार्यक्षम करण्याकडे कंपनीचा कल असल्याचे दिसून येत आहे.
जर तुम्ही तुमचे चॅटिंग मनोरंजक बनवण्यासाठी रोज अवताराचा वापर करत असाल, तर हा बदल तुमच्या अनुभवावर नक्कीच परिणाम करेल. व्हॉट्सॲपच्या इतर मुख्य फीचर्सवर याचा कोणताही नकारात्मक परिणाम होणार नसला तरी, हे प्लॅटफॉर्म युजर्सच्या वर्तनानुसार सतत बदलत असते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा जुन्या साध्या इमोजी आणि स्वतःच्या फोटोंवरच युजर्सना समाधान मानावे लागणार आहे.
व्हॉट्सॲपमधील हे बदल जागतिक स्तरावर राबवले जात आहेत. तुमच्या ॲपमध्ये अजूनही अवतार दिसत असेल, तर ते लवकरच बंद होऊ शकते. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या डिजिटल अवताराचा बॅकअप हवा असेल, तर त्याचे स्क्रीनशॉट्स काढून ठेवणे हाच सध्या एकमेव पर्याय उरला आहे. बदल हा निसर्गाचा नियम असला तरी, तंत्रज्ञानाच्या जगातही आवडीची फिचर्स कधी निरोप घेतील, याचा नेम उरलेला नाही.
हेही वाचा: CBSE Syllabus: सीबीएसईचा शाळांना मोठा दणका; तिसरी भाषा निवडण्यासाठी 31 मे डेडलाईन; नियम मोडला तर होणार कडक कारवाई