अहमदाबाद: गुजरातमधील अहमदाबाद येथे आज एअर इंडियाचे विमान कोसळले. या अपघातात 2 पायलट आणि 10 क्रू मेंबर्ससह 242 प्रवासी होते, त्यापैकी फक्त एक प्रवासी रमेश विश्वास कुमार बचावला. या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा दिल्लीहून अहमदाबादला आले. त्यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी सांगितले की, विमानात 1.25 लाख लिटर इंधन होते, त्यामुळे कोणालाही वाचण्याची संधी मिळाली नाही.
दरम्यान, अमित शहा यांनी अहमदाबाद विमान अपघाताबाबत केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू किंजरापु, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि इतरांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर अमित शहा यांनी एअर इंडियाच्या विमान AI171 च्या अपघाताबाबत पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की, 'या विमानात भारत आणि परदेशातील एकूण 230 प्रवासी होते, तसेच 12 क्रू मेंबर्स होते. या अपघातात एक प्रवासी वाचला असून मी त्याची भेट घेतली आहे.' या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे आणि या दुर्दैवी दुर्घटनेत बाधित झालेल्यांच्या कुटुंबियांसोबत संपूर्ण देश पूर्ण सहानुभूती दाखवत आहे. या अपघातानंतर भारत सरकार आणि गुजरात सरकारचे सर्व विभाग एकत्र आले असून मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत, असंही अमित शाहा यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - अहमदाबाद विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना टाटा ग्रुपकडून 1 कोटी रुपयांची भरपाई जाहीर
1 हजार DNA चाचण्या करण्यात येणार -
या अपघातात विमानाच मोठा स्फोट झाला. ज्यामुळे विमानातील प्रवाशांची ओळख पटवणे खूपचं कठीण झाले आहे. येथे पोहोचलेल्या सर्व प्रवाशांच्या नातेवाईकांच्या डीएनए संकलनाची प्रक्रिया पुढील 2-3 तासांत पूर्ण केली जाईल. ज्यांचे नातेवाईक परदेशात आहेत त्यांना माहिती देण्याची प्रक्रिया आधीच पूर्ण झाली आहे. ते येताच त्यांचे डीएनए नमुने देखील गोळा केले जातील. सुमारे 1000 डीएनए चाचण्या केल्या जातील. गुजरात फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) आणि राष्ट्रीय फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी शक्य तितक्या कमी वेळेत डीएनए चाचणी पूर्ण करण्यासाठी एकत्र काम करतील. पडताळणीनंतर, मृतदेह संबंधित कुटुंबियांना सुपूर्द केले जातील, असंही अमित शहा यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा - विमान अपघातामुळे किती कोटी रुपयांचे नुकसान होते? आकडा ऐकून व्हाल अवाक!
विमानात 1.25 लाख लिटर इंधन -
दरम्यान, केंद्र सरकारला अपघातानंतर 10 मिनिटांत माहिती मिळाली. मी गुजरातचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि नागरी उड्डाण मंत्री यांच्याशी संपर्क साधला. डीएनए पडताळणीनंतर मृतांची संख्या सांगितली जाईल. विमानात सुमारे 1,25,000 लिटर इंधन होते. मी अपघातस्थळाला भेट दिली. मृतदेह काढण्याचे काम जवळजवळ पूर्ण झाले असल्याचे अमित शहांनी यावेळी सांगितलं.