Wednesday, July 09, 2025 09:45:53 PM

एअर इंडियाच्या मागे लागली साडेसाती? विमानात पुन्हा बिघाड, रांचीला जाणारे विमान दिल्लीला परतले

सोमवारी एअर इंडियाच्या दोन फ्लाईटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं उघडकीस आलं आहे. त्यामुळे आता एअर इंडियाच्या मागे साडेसाती लागली की काय? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडू लागला आहे.

एअर इंडियाच्या मागे लागली साडेसाती विमानात पुन्हा बिघाड रांचीला जाणारे विमान दिल्लीला परतले
Air India Express Flight
Edited Image

नवी दिल्ली: अहमदाबाद अपघातानंतर गेल्या दोन दिवसांपासून विमानाच्या तांत्रिक बिघाडासंदर्भात अनेक बातम्या समोर येत आहेत. तथापी, या अपघातानंतर सर्व विमान कंपन्या सावध झाल्या असून विमानाचे उड्डाण करण्यापूर्वी विमानाची तपासणी करत आहेत. अशातचं आज दोन ते तीन विमानांमध्ये बिघाड असल्याचं आढळून आलं. सोमवारी एअर इंडियाच्या दोन फ्लाईटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं उघडकीस आलं आहे. त्यामुळे आता एअर इंडियाच्या मागे साडेसाती लागली की काय? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडू लागला आहे. 

रांचीला जाणारे विमान दिल्लीला परतले - 

सोमवारी दिल्लीहून रांचीला जाणारे एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान उड्डाणानंतर परत दिल्लीला वळवण्यात आले. हे विमान सायंकाळी 6:20 वाजता रांचीच्या बिरसा मुंडा विमानतळावर उतरणार होते, परंतु उड्डाणानंतर ते परत दिल्लीला वळवण्यात आले. एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्याने सांगितले की, टेकऑफनंतर संशयास्पद तांत्रिक समस्येमुळे आमच्या एका विमानाला दिल्लीला परतावे लागले. त्यांनी सांगितले की तपासणी आणि मंजुरीनंतर विमानाने नियोजित ऑपरेशन सुरू ठेवण्यात येईल.

प्राप्त माहितीनुसार, सोमवारी एअर इंडियाच्या विमान एआय 9695 ने दिल्लीहून 4:25 वाजता उड्डाण केले. त्यानंतर विमान परत दिल्लीला वळवण्यात आले आहे. विमानातील तांत्रिक समस्या असल्याचे आढळून आले. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. एअर इंडियाचे हे विमान सायंकाळी 6:20 वाजता रांचीच्या बिरसा मुंडा विमानतळावर उतरणार होते. रांचीमध्ये वाट पाहणाऱ्या प्रवाशांना याबद्दल आधीच माहिती देण्यात आली होती.

हेही वाचा - एअर इंडियाच्या ड्रीमलाइनर विमानात पुन्हा तांत्रिक बिघाड! हाँगकाँगहून दिल्लीला येणारे विमान परतले

कानपूरजवळ आढळला तांत्रिक बिघाड - 

एअर इंडियाच्या विमानाने दिल्ली विमानतळावरून रांचीसाठी उड्डाण केले. परंतु, कानपूरजवळील विमानात काही तांत्रिक बिघाड जाणवला. त्यानंतर विमानाच्या पायलटने अधिकाऱ्यांशी बोलून प्रवाशांना याची माहिती दिली. यानंतर प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. क्रू मेंबर्सनी प्रवाशांना कसेतरी सांभाळले आणि त्यांना शांत केले.

हेही वाचा - प्रवाशांचा जीव पुन्हा धोक्यात! हिंडन विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानात तांत्रिक बिघाड; टेकऑफ रद्द

हाँगकाँगहून दिल्लीला येणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड - 

यापूर्वी आज एअर इंडियाच्या एका विमानात बिघाड आढळून आला होता. हाँगकाँगहून दिल्लीला येणाऱ्या विमानाच्या पायलटला इंजिनमध्ये समस्या जाणवली. एअर इंडियाच्या AI315 विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानंतर ते पुन्हा हाँगकाँगला परतले. बिघाड झालेले विमान बोईंग 787-8 ड्रीमलाइनर होते. 


सम्बन्धित सामग्री