सध्या संपूर्ण राष्ट्रीय राजधानी दिल्लीला अक्षरशः छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कथित कारभाराविरोधात कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने पुकारलेल्या आंदोलनामुळे वातावरण प्रचंड तापले आहे. CJP च्या आवाहनानंतर हजारो नागरिक दिल्लीच्या जंतरमंतर मैदानाकडे कूच करत आहेत, मात्र लोकांची गर्दी रोखण्यासाठी प्रशासनाकडून मोठी दडपशाही सुरू आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठी यांच्यासह CJP प्रमुख अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांनाही दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या महत्त्वाच्या नेत्यांना अटक झाल्यानंतर आता या आंदोलनाची संपूर्ण धुरा CJP नेते अजिंक्य शिंदे यांनी सांभाळली आहे. सूत्रे हाती घेताच शिंदे यांनी एक आक्रमक व्हिडिओ जारी करत देशातील नागरिकांना थेट रस्त्यावर उतरण्याचे मोठे आवाहन केले आहे.
“सरकार देशाच्या एकजुटतेला घाबरले;” अभिजीत दीपके यांचा अटकेपूर्वीचा व्हिडिओ समोर
पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वी अभिजीत दीपके यांनी एक संदेश असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल, तर आम्ही अटक झालो आहोत हे समजावे. आमच्यानंतर या संपूर्ण आंदोलनाचे नेतृत्व अजिंक्य शिंदे करतील आणि मी सर्वांना विनंती करतो की शिंदेंच्या सूचनेनुसारच सर्वानी वाटचाल करावी.” यानंतर, अजिंक्य शिंदे यांनी आणखी एक व्हिडिओ जारी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. “अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना हुकूमशाही सरकारने विमानतळावरच रोखले. हे सरकार देशाच्या वाढत्या एकजुटतेला आणि जनक्षोभाला घाबरले आहे. गेल्या वेळीही संपूर्ण देशाने दिल्लीत येऊन या सरकारचा अहंकार धुळीस मिळवला होता,” अशी आठवण शिंदेंनी करून दिली.
मतदानाच्या अधिकारासाठी नवी लढाई सुरू
सरकारने आंदोलनाला आळा घालण्यासाठी दिल्लीकडे येणाऱ्या बसेस, रेल्वे सेवा रोखल्या आणि अनेक मार्गांवर कडक निर्बंध लादले, यावरून शिंदे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “सरकारला आमची असलेली भीती म्हणजे आपण आधीच अर्धी लढाई जिंकल्याचे लक्षण आहे. आता या नव्या लढाईची सुरुवात झाली आहे. ज्या सामान्य जनतेचा मतदानाचा हक्क आणि अधिकार हिरावून घेतला गेला आहे, तो अधिकार पुन्हा मिळवण्यासाठी आमचा हा लढा आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. ज्ञानेश कुमार यांनी केलेल्या कथित मतचोरीविरोधात हा आवाज उठवला जात असून, संपूर्ण दिल्लीत अघोषित आणीबाणी लागू करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. “जिथे पोलीस तुम्हाला अडवतील, तिथल्या जागेलाच आपले जंतरमंतर समजा आणि रस्त्यावर उतरा. जोपर्यंत ज्ञानेश कुमार आपला राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत हा संघर्ष असाच सुरू राहील,” असा ठाम निश्चय अजिंक्य शिंदे यांनी व्यक्त केला आहे.