Maithili Thakur: बिहारच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या उमेदवार यादीत लोकगायिका मैथिली ठाकूर यांचे नाव आहे. आपल्या संगीताने प्रेक्षकांच्या हृदयात घर करणाऱ्या मैथिली ठाकूर आता थेट राजकीय रणांगणात उतरल्या असून, भाजपने त्यांना दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. अलीनगर ही जागा केवळ भौगोलिकदृष्ट्याच नव्हे, तर राजकीयदृष्ट्याही अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाची मानली जाते. 2008 मध्ये नवीन तयार झालेल्या या मतदारसंघावर दीर्घकाळ राजदचे वरिष्ठ नेते अब्दुल बारी सिद्दीकी यांचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे भाजपची ही निवड सिद्दीकींच्या बालेकिल्ल्यावर हल्ला मानली जात आहे.
मैथिली ठाकूर ही युवा लोकगायिका सोशल मीडियावर लाखो चाहत्यांची लाडकी आहे. बिहारच्या सांस्कृतिक ओळखीचं आधुनिक रूप जपत तिने देशभरात प्रसिद्धी मिळवली. आता तिचा प्रवास संगीत मंचावरून राजकीय व्यासपीठाकडे वळला आहे. भाजपमध्ये नुकत्याच सामील झालेल्या ठाकूर यांना अलीनगरसारख्या संवेदनशील आणि जातीयदृष्ट्या गुंतागुंतीच्या मतदारसंघात तिकीट देण्यात आल्याने भाजपच्या रणनीतीचे गूढ आणखी खोल जाते.
हेही वाचा - Indian Army Recruitment 2025 : भारतीय लष्करात अधिकारी बनण्याची संधी; अर्ज करण्याची प्रक्रिया, वयोमर्यादा वाचा एका क्लिकवर
अलीनगर मतदारसंघात आजवर फक्त तीनच निवडणुका झाल्या आहेत. 2010 आणि 2015 मध्ये अब्दुल बारी सिद्दीकी यांनी सलग विजय मिळवत आरजेडीचा झेंडा रोवला. परंतु 2020 मध्ये त्यांनी निवडणूक लढवली नाही आणि त्यांच्याऐवजी मैदानात उतरलेल्या उमेदवाराचा पराभव झाला. त्यानंतर ही जागा एनडीएच्या मिश्रीलाल यादव यांच्या ताब्यात गेली. विशेष म्हणजे मिश्रीलाल यादव यांनी पूर्वी भाजपच्या तिकिटावर सिद्दीकींकडून पराभव पत्करला होता.
हेही वाचा - Restrictions For Teenage : किशोरवयीन मुलांसाठी इंस्टाग्रामचा मोठा बदल; आता दिसणार नाही 18+ कंटेंट
दरम्यान, अलीनगरमधील राजकारण जातीय आणि धार्मिक समीकरणांनी भारलेले आहे. या मतदारसंघात मुस्लिमांची लोकसंख्या 21 टक्क्यांच्या घरात असून, ब्राह्मण मतदारांचाही प्रभावी भाग आहे. त्याशिवाय अनुसूचित जातींचं प्रमाणही सुमारे 12.37 टक्के आहे. अशा मिश्र लोकसंख्येतून कोणतीही बाजू गाठण्यासाठी ब्राह्मण-मुस्लिम एकत्रित मत मिळवणं गरजेचं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून ब्राह्मण उमेदवार असलेल्या मैथिली ठाकूर यांना तिकीट देण्यात आले आहे.
मैथिली ठाकूर ब्राह्मण समाजातील असूनही, जर त्या अलीनगरसारख्या मुस्लिम प्रभाव असलेल्या मतदारसंघातून विजय मिळवतात, तर भाजप याचा उपयोग ‘समावेशक भाजप’ असा संदेश देण्यासाठी करू शकतो, असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे. मैथिली ठाकूर यांचा अलीनगरमधील प्रवेश ही भाजपची एक धाडसी, पण स्मार्ट रणनीती आहे. सांस्कृतिक प्रभावाला राजकीय भांडवलात रूपांतरित करण्याचा हा प्रयत्न यशस्वी होतो का? हे पाहणं रंजक ठरेल.