श्रीनगर: पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारताला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. भारताच्या दबावाखाली पाकिस्तानने सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) जवान पूर्णम कुमार साहू यांची सुटका केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला असताना, 23 एप्रिल रोजी पूर्णम कुमार साहू यांना आंतरराष्ट्रीय सीमेवरून पाकिस्तानी रेंजर्सनी ताब्यात घेतले होते. तेव्हापासून त्याला परत आणण्याची मागणी होत होती. आज, तब्बल 20 दिवसांनी साहू परतला आहे.
भारतीय जवान साहू होता पाकिस्तान रेंजर्सच्या ताब्यात -
बीएसएफ जवान पूर्णम कुमार साहू 23 एप्रिल पासून पाकिस्तान रेंजर्सच्या ताब्यात होते. मिळालेल्या माहितीनुसार, आज बुधवारी सकाळी 10.30 वाजता अमृतसरमधील संयुक्त चेक पोस्ट अटारी मार्गे साहूला भारताच्या ताब्यात देण्यात आले. बीएसएफच्या प्रवक्त्याने माहिती दिली आहे की, भारत आणि पाकिस्तानमधील हे हस्तांतरण शांततेत आणि स्थापित प्रोटोकॉलनुसार झाले आहे.
हेही वाचा - पाकिस्तानशी मैत्री भोवली! सफरचंदानंतर आता तुर्कीतून येणाऱ्या 'मार्बल'वर बंदी
काय आहे संपूर्ण प्रकरण?
बीएसएफ कॉन्स्टेबल पूर्णम कुमार साहू हे पंजाबच्या फिरोजपूर सेक्टरमध्ये तैनात होते. २३ एप्रिल रोजी, भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या लष्करी तणावाच्या सुरुवातीच्या काळात, साहूने चुकून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली. यानंतर, त्याला पाकिस्तानी रेंजर्सनी ताब्यात घेतले.
हेही वाचा - मोठी कारवाई! चिनी मुखपत्र 'ग्लोबल टाईम्स'च्या X अकाउंटवर भारतात बंदी
भारताच्या ताब्यातही आहे एक पाकिस्तानी सैनिक -
दरम्यान, भारतीय सुरक्षा दलांनी 3 मे रोजी राजस्थानमध्ये एका पाकिस्तानी रेंजर्स सैनिकाला अटक केली होती. बीएसएफने श्रीगंगानगरमधील सीमेजवळ ही अटक केली. वृत्तानुसार, पाकिस्तानी रेंजर्सचा सैनिक भारतीय सीमेत घुसण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर बीएसएफच्या जवानांनी त्याला थांबवले आणि ताब्यात घेतले.