Gujarat Cabinet Reshuffle: गुजरातच्या राजकारणात शुक्रवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखालील नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी समारंभ पार पडला. या सोहळ्याने राज्याच्या राजकीय समीकरणांमध्ये नव्या टप्प्याची सुरुवात केली आहे. गुरुवारीच मुख्यमंत्री वगळता सर्व मंत्र्यांनी आपल्या पदांचा राजीनामा देऊन नव्या मंत्रीमंडळासाठी मार्ग मोकळा केला होता. त्यामुळे भाजपच्या या निर्णयाकडे मोठ्या संघटनात्मक बदलाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.
हर्ष संघवी यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
या नव्या मंत्रिमंडळातील सर्वात मोठा बदल म्हणजे हर्ष संघवी यांची उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती. सुरतचे आमदार आणि गृहराज्यमंत्री म्हणून ओळखले जाणारे संघवी हे भाजपमधील तरुण आणि प्रभावी नेते मानले जातात. त्यांच्या कार्यकौशल्य, प्रशासनातील तत्परता आणि तरुणांमधील लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
हेही वाचा - Sabarimala Gold Theft Case: केरळ SIT ची मोठी कारवाई! शबरीमला सोने चोरी प्रकरणात मुख्य आरोपी उन्नीकृष्णन पोट्टी अटकेत
संघवी यांनी गृहराज्यमंत्री म्हणून बांगलादेशी घुसखोरांविरोधात केलेल्या बुलडोझर कारवाईमुळे चर्चेत आले होते. आता उपमुख्यमंत्री पदावर त्यांची नेमणूक ही त्यांच्या राजकीय प्रवासातील मोठी झेप मानली जात आहे. 2027 च्या निवडणुकांमध्ये भाजप पुन्हा सत्तेत आल्यास संघवी हे मुख्यमंत्रीपदाचे संभाव्य चेहरा ठरू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नवीन मंत्र्यांचा शपथविधी
हर्ष संघवींसह जितेंद्र वाघानी आणि अर्जुन मोढवाडिया यांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सकाळी राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेऊन मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली होती. मंजुरी मिळाल्यानंतर नवीन मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली.
नवीन मंत्रीमंडळात कोणाचा समावेश?
एएनआयच्या अहवालानुसार, एकूण 26 मंत्री शपथ घेतली असून यात नवीन आणि अनुभवी दोन्ही चेहऱ्यांचा समावेश आहे. यातील मुख्य नावे पुढीलप्रमाणे आहेत: हर्ष संघवी, जितेंद्र वाघानी, अर्जुन मोढवाडिया, रिवाबा जडेजा, ऋषिकेश पटेल, स्वरूपजी ठाकोर, कुंवरजी बावलिया, पुरुषोत्तम सोलंकी, कनुभाई देसाई, दर्शना वाघेला, प्रविणकुमार माळी, प्रफुल्ल पानशेरिया आदी.
हेही वाचा - Gunratan Sadavarte: एसटी बँकेच्या राड्यानंतर गुणरत्न सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया समोर, 'आमच्या लाडक्या बहिणींना त्रास दिला...'
मोठ्या राजकीय पुनर्रचनेचा संदेश
गुजरात भाजपने या मंत्रिमंडळ विस्तारातून युवाशक्ती, प्रादेशिक प्रतिनिधित्व आणि संघटनात्मक संतुलन यावर भर दिला आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, हर्ष संघवींची बढती ही भविष्यातील नेतृत्व तयार करण्याच्या रणनीतीचा भाग आहे.