नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, या बैठकीत फडणवीस सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करत यंदाची त्यांची दिवाळी सुखकर केली आहे. अशातच केंद्रातून देखील मोठी अपडेट समोर आली आहे. भारतीय रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी केंद्रीय सरकारकडून महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रातील मोदी सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांना उत्पादकतेशी जोडलेला बोनस देण्यास मंजुरी दिली आहे.
यावेळी केंद्र सरकारने रेल्वेतल्या 11 लाख 40 हजार 770 पात्र कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या वेतनाइतका उत्पादकता संलग्न बोसन देण्याचे जाहीर केले आहे. या निर्णयाचा लाभ पात्र अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांना होणार आहे. ट्रॅक मेंटेनर, लोको पायलट, ट्रेन मॅनेजर, स्टेशन मास्तर, तंत्रज्ञ, पॉइंट्समन आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश होऊ शकतो. सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा- राज्यातील 305 तालुक्यात दुष्काळ जाहीर! दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारचे धडाधड निर्णय
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली आहे. यावेळी वैष्णव यांनी सांगितले की, सरकार कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून एकूण 2,009 कोटी रुपये देणार आहे. तर केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, रेल्वेमध्ये 1 लाख 65 हजार पदांवर भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.
रेल्वे कर्मचाऱ्यांना दिला जाणारा हा बोनस त्यांच्या कामगिरीशी आणि रेल्वेच्या उत्पादकतेशी संबंधित असतो. म्हणजेच रेल्वेच्या कामकाजातील कर्मचाऱ्यांचे योगदान आणि कामगिरीशी संबंधित निकष लक्षात घेऊन पात्र कर्मचाऱ्यांना हा बोनस दिला जातो. यावेळी केंद्र सरकारने पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या वेतनाच्या आधारे बोनस द्यायला मंजुरी दिली असून प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रत्यक्ष किती रक्कम मिळणार, हे बोनस वितरणाच्या प्रक्रियेनुसार केली जाईल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.