Name of Delhi Be Changed? : केंद्र आणि विविध राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे (BJP) सरकार आल्यापासून अनेक शहरे, जिल्हे आणि संस्थांची नावे बदलण्यात आली आहेत. आता थेट देशाची राजधानी दिल्लीचे नाव बदलण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. भाजपचे दिल्लीतील खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून दिल्लीचे नाव 'इंद्रप्रस्थ' ठेवण्याची विनंती केली आहे.
पांडवांच्या इतिहासाशी जोडलेली आहे मागणी
खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात दिल्लीचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा स्पष्ट केला आहे. ते म्हणाले, "आपल्या सर्वांना ज्ञात आहे की, दिल्लीचा इतिहास थेट पांडवांशी जोडलेला आहे. महाभारत काळात पांडवांनी यमुनेच्या काठावर त्यांची राजधानी 'इंद्रप्रस्थ नगरी' ची स्थापना केली होती. ते एक समृद्ध आणि नीतीमत्तेवर चालणारे नगर होते."
वारसा पुनरुज्जीवित करण्याची मागणी: खंडेलवाल यांच्या मते, दिल्लीची गौरवशाली संस्कृती, सभ्यता, वारसा आणि परंपरा इंद्रप्रस्थ या नावाशी जोडली गेली आहे. जर दिल्लीचे नामकरण इंद्रप्रस्थ केले, तर निश्चितच आपल्या ऐतिहासिक परंपरांचे पुनरुज्जीवन होईल. तसेच, या शहराचे सांस्कृतिक महत्त्व मोठे आहे. भारताच्या सांस्कृतिक वारशांमध्ये दिल्लीचे विशेष स्थान आहे. हे केवळ एक महानगर नसून, भारताच्या संस्कृतीचे केंद्र आहे.
हेही वाचा - Hyderabad Airport: हैदराबाद विमानतळावर अलर्ट; सायबर ईमेलद्वारे बॉम्ब धमकी, इंडिगो विमान सुरक्षित उतरवलं
खासदाराने सुचवले 'हे' बदल
दिल्लीचे नाव बदलून 'इंद्रप्रस्थ' करण्याची मागणी करताना, खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी काही विशिष्ट ठिकाणांची नावेही बदलण्याची सूचना केली आहे:
- जुने दिल्ली रेल्वे स्थानक : याचे नाव बदलून इंद्रप्रस्थ जंक्शन करावे.
- इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ : याचे नाव बदलून इंद्रप्रस्थ विमानतळ करावे.
- पुतळ्यांची मागणी : तसेच, दिल्लीतील प्रमुख चौकांमध्ये पांडवांचे भव्य पुतळे उभारावेत, जेणेकरून तरुण पिढीला त्याबद्दल अधिक माहिती मिळू शकेल.
विश्व हिंदू परिषदेचाही (VHP) पाठिंबा
खासदार प्रवीण खंडेलवाल यांच्या मागणीला विश्व हिंदू परिषदेने (VHP) देखील पाठिंबा दिला आहे. व्हीएचपी दिल्लीचे प्रांत सचिव सुरेंद्र कुमार गुप्ता यांनी दिल्लीचे सांस्कृतिक मंत्री कपिल मिश्रा यांना पत्र लिहून दिल्लीच्या प्राचीन इतिहासाशी नाळ जोडण्यासाठी शहराचे नाव इंद्रप्रस्थ करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा - हृदयद्रावक! आंध्र प्रदेशातील व्यंकटेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी; 9 भाविकांचा मृत्यू, दक्षिण भारतातल्या घटनेमुळे खळबळ