Thursday, November 13, 2025 02:22:33 PM

Hyderabad Airport: हैदराबाद विमानतळावर अलर्ट; सायबर ईमेलद्वारे बॉम्ब धमकी, इंडिगो विमान सुरक्षित उतरवलं

ईमेलमधील बॉम्ब धमकीनंतर हैदराबाद विमानतळावर सुरक्षा वाढवण्यात आली. इंडिगो फ्लाइट दुसऱ्या विमानतळावर वळवली गेली, प्रवाशांना सुरक्षित ठेवण्यात आलं.

hyderabad airport हैदराबाद विमानतळावर अलर्ट सायबर ईमेलद्वारे बॉम्ब धमकी इंडिगो विमान सुरक्षित उतरवलं

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी पहाटे बॉम्बची धमकी मिळाल्याने सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली. या धमकीनंतर अधिकाऱ्यांनी इंडिगोच्या एका विमानाला जवळच्या विमानतळावर वळवण्याचा निर्णय घेतला. विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 1 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 5.25 वाजता RGIA च्या कस्टमर सपोर्ट टीमला एक संशयास्पद ईमेल मिळाला होता. हा ईमेल customersupport@gmrgroup.in या अधिकृत पत्त्यावरून ‘Papita Rajan’ नावाच्या व्यक्तीने पाठवला होता. ईमेलचा विषय होता “Indigo 68 ची हैदराबाद लँडिंग थांबवा.”

या ईमेलमध्ये लिहिलं होतं की, "1984 मधील मद्रास विमानतळावर झालेल्या घटनेप्रमाणे मोठा स्फोट करण्याचा कट रचत आहेत. हा स्फोट विमानतळावरील विमानांच्या इंधन टाक्यांमध्ये बसवलेल्या मायक्रोबॉट्स आणि फ्यूजलेजद्वारे करण्यात येणार आहे. या स्फोटात नर्व गॅस वापरला जाईल.” ईमेलमध्ये पुढे लिहिलं होतं की, “ही फ्रँकफर्ट ऑपरेशनसाठी चाचणी आहे आणि आयईडीच्या लोकेशनची माहिती ‘स्टेग्नोग्राफिक डॉक्युमेंट’मध्ये दिली आहे.”

हेही वाचा:हृदयद्रावक! आंध्र प्रदेशातील वेंकटेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी; 9 भाविकांचा मृत्यू, दक्षिण भारतातल्या घटनेमुळे खळबळ

या धमकीनंतर बॉम्ब थ्रेट अ‍ॅसेसमेंट कमिटीची आपत्कालीन ऑनलाइन बैठक घेण्यात आली. समितीने या धमकीला “विशेष जोखमीचा धोका” असे घोषित केले आणि सुरक्षा कारणास्तव संबंधित इंडिगो फ्लाइटला जवळच्या विमानतळावर वळवण्याचा निर्णय घेतला. यानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) मार्फत फ्लाइटच्या कॅप्टनला सूचना देण्यात आल्या. कॅप्टनने तात्काळ विमान सुरक्षितपणे उतरवले आणि विमानतळ प्रशासनाला माहिती दिली. विमानतळ परिसरात सुरक्षा तपासणी आणि स्फोटक शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

जीएमआर सिक्युरिटीने स्थानिक पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. सध्या ईमेलचा स्रोत, ‘पपीता राजन’ या नावामागील खरी व्यक्ती आणि तिचा देशाशी असलेला संबंध शोधण्यासाठी तपास सुरू आहे. प्राथमिक तपासानुसार, ही धमकी सायबर नेटवर्कमार्फत पाठवलेली असू शकते. सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे आणि सर्व प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. या घटनेनंतर विमानतळावरील सुरक्षा अलर्ट स्तर वाढवण्यात आला असून, सर्व उड्डाणांची तपासणी अधिक काटेकोरपणे केली जात आहे.

हेही वाचा: Ajit Pawar: अजित पवारांच्या वक्तव्याने शेतकरी संतप्त; पवार म्हणाले, "सारखं कर्ज माफ कशाला करायचं"


सम्बन्धित सामग्री