Abhijeet Dipke: ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे सह-संस्थापक आशुतोष रांका आणि त्यांच्या टीमला आसाम पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रांका यांनी स्वतः ही माहिती दिली असून, CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी या कारवाईचा तीव्र निषेध केला आहे. दीपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत म्हटले की, “हिमंता, तुम्हाला इतकी भीती का वाटते?”
दिपके यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले की, आसाम पोलिसांनी रांका आणि त्यांच्या टीमला ताब्यात घेऊन एका अज्ञात स्थळी नेले आहे. ज्या ठिकाणी त्यांना ठेवण्यात आले आहे, त्या ठिकाणाबाहेर वकील उभे असूनही पोलीस त्यांना आत जाण्याची परवानगी देत नाहीत. आशुतोष रांका यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, हिमंता बिस्वा सरमा यांना भीती वाटते की, जर त्यांनी आसाममधील शाळांचे वास्तव उघड केले, तर देशाला तिथल्या खऱ्या स्थितीबद्दल समजेल. तसेच काझीरंगामधील लोकांचे हक्क हिरावून त्यांची जमीन आणि जंगले कॉर्पोरेट कंपन्यांच्या हवाली केली जात असल्याचे सत्य बाहेर येईल, अशीही त्यांना भीती वाटत आहे. या घटनेच्या निषेधार्थ CJP ने दिल्लीत निषेध मोर्चा काढण्याची योजना जाहीर केली आहे.
Assam Police has detained @AshutoshRanka and CJP team and taking them to an unknown location. Ashu and co were going to have a small volunteers meet up in Assam. — Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) September 27, 2026
स्वयंसेवकांच्या बैठकीपूर्वीच पोलिसांनी केली कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, आशुतोष रांका आणि त्यांची टीम आसाममधील गुवाहाटी येथे स्वयंसेवकांच्या एका बैठकीसाठी जात होती. मात्र बैठक सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. CJP ने गुवाहाटीमध्ये आपली पहिली प्रादेशिक स्वयंसेवक बैठक आयोजित करण्याची तयारी केली होती, ज्यामध्ये अनेक नेते आणि स्वयंसेवक उपस्थित राहणार होते. पोलिसांवर आरोप आहे की त्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणाकडे जाणारे रस्ते अडवले आणि उपस्थितांना तिथे पोहोचण्यापासून रोखले. आशुतोष रांका शनिवारपासून आसाममध्ये असून ते या बैठकीला संबोधित करणार होते. यापूर्वी, मतदार याद्यांच्या पुनरीक्षणामुळे बाधित झालेल्या कुटुंबांची भेट घेणे आणि तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सरकारी शाळांना भेट देणे हा त्यांच्या दौऱ्याचा उद्देश असल्याचे संघटनेने स्पष्ट केले होते.