दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई करत पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स तसेच बांगलादेशस्थित अतिरेकी संघटनांशी संबंधित संशयित दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. रविवारी करण्यात आलेल्या समन्वित कारवाईत तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल येथून आठ संशयितांना अटक करण्यात आली. परदेशी सूत्रांच्या निर्देशावर भारतात मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कट रचला जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये मिजानूर रहमान, मोहम्मद शबत, उमर, मोहम्मद लितान, मोहम्मद शाहिद आणि मोहम्मद उज्जल यांचा समावेश असून त्यांना तामिळनाडूतील तिरुपूर जिल्ह्यातील गारमेंट उद्योगांमधून ताब्यात घेण्यात आले. उर्वरित दोघांना पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली. तपासादरम्यान काही आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचे समोर आले असून त्यांनी बनावट आधार कार्डचा वापर करून ओळख लपवली होती.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर दहशतवादाला समर्थन देणाऱ्या संशयास्पद पोस्ट्सच्या तपासातून या नेटवर्कचा माग काढण्यात आला. स्थानिक पोलिसांच्या मदतीने तिरुपूर येथे छापेमारी करण्यात आली असता आरोपी गारमेंट कारखान्यांमध्ये काम करत असल्याचे आढळून आले. या कारवाईदरम्यान पोलिसांनी आठ मोबाईल फोन आणि 16 सिम कार्ड जप्त केले असून त्यांची डिजिटल फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.
हेही वाचा: Mumbai Record Breaking AQI: मुंबईचा 'गॅस चेंबर' होतोय का? मागील सात वर्षांतील प्रदूषणाचे सर्व रेकॉर्ड मोडले; 'हा' आकडा वाचून तुमची धडकी भरेल
या मॉड्यूलचा उलगडा दिल्लीतील विविध भागांमध्ये, विशेषतः दिल्ली मेट्रो परिसरात लावण्यात आलेल्या भडकाऊ पोस्टर्सनंतर झाला. काश्मीरसंदर्भातील उत्तेजक मजकूर असलेल्या या पोस्टर्समुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. पोस्टर्सच्या उगमाचा सखोल तपास करताना तपास यंत्रणांना तामिळनाडूमध्ये कार्यरत असलेल्या या संशयित नेटवर्कपर्यंत पोहोचता आले.
दरम्यान, पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबा संघटनेकडून दिल्लीतील गर्दीची धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळे लक्ष्य करण्याचा कट असल्याची गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर राजधानीत हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. चांदणी चौक परिसरातील मंदिर तसेच लाल किल्ला परिसरात आयईडी हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
सुरक्षा अधिकाऱ्यांच्या मते, ही कारवाई संभाव्य दहशतवादी कट उधळून लावण्यात मोठे यश मानली जात आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुढील चौकशी आणि कायदेशीर प्रक्रियेसाठी दिल्लीमध्ये आणले जात असून आर्थिक व्यवहार, परदेशी संपर्क आणि इतर संभाव्य सहकाऱ्यांचा शोध घेण्यासाठी तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.
हेही वाचा: ACB Raid: लाचखोरीचा पर्दाफाश! बीडच्या तहसीलदाराच्या घरावर छापा; 13 तोळे सोने आणि हजारोंची रोकड जप्त