‘जंतर-मंतरवर…’ ध्रुव राठीचं भारतात येताच मोठं आवाहन; अभिजित दीपकेसोबत प्रकाश राजही, मुख्य निवडणूक आयुक्तांना इशारा देत म्हणाले, ‘आली रे आली…’

दिल्लीतील 10 ऑक्टोबरच्या आंदोलनानंतर या लढाईला काय वळण मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

‘जंतर-मंतरवर…’ ध्रुव राठीचं भारतात येताच मोठं आवाहन; अभिजित दीपकेसोबत प्रकाश राजही, मुख्य निवडणूक आयुक्तांना इशारा देत म्हणाले, ‘आली रे आली…’
Abhijit Dipke

Dhruv Rathee Abhijeet Dipke CJP Protest: मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत मतदार यादीतील कथित घोळ आणि अन्यायाविरोधात कॉकरोच जनता पार्टीने (CJP) तीव्र आंदोलन पुकारले आहे. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी या आंदोलनासंदर्भात एक विशेष व्हिडीओ शेअर केला आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठी (Dhruv Rathee) भारतात दाखल झाला आहे. आज, 08 ऑक्टोबर 2026 रोजी बंगळुरूच्या फ्रीडम पार्क येथे झालेल्या ‘चप्पल आंदोलनात’ आणि लोकांच्या न्यायालयात ध्रुव राठीने प्रत्यक्ष सहभाग नोंदवला.

प्रकाश राज यांचा बॉलिवूड शैलीत मुख्य निवडणूक आयुक्तांना इशारा
अभिजीत दीपके आणि ध्रुव राठी यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओमध्ये दाक्षिणात्य व बॉलिवूड अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) देखील आक्रमक भूमिकेत दिसत आहेत. त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर निशाणा साधत ‘आली रे आली ज्ञानू तुझी बारी आली’ असा थेट इशारा दिला. केंद्र सरकार आणि भाजपच्या धोरणांवर युट्युबच्या माध्यमातून नेहमीच टीका करणाऱ्या ध्रुव राठीची या आंदोलनातील उपस्थिती राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

10 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतर-मंतरवर भव्य आंदोलनाची हाक
आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करताना ध्रुव राठीने देशातील तरुणांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. ‘ही लढाई देशाची लोकशाही वाचवण्यासाठी आहे, त्यामुळे 08 ऑक्टोबर रोजी फ्रीडम पार्कमध्ये जमल्यानंतर आता 10 ऑक्टोबर 2026 रोजी दिल्लीतील जंतर-मंतरवर होणाऱ्या आंदोलनात सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,’ असे राठी व्हिडीओमध्ये म्हणाला. लोकशाहीच्या रक्षणासाठी तरुणांनी पुढे यावे, असा पुनरुच्चार अभिजीत दीपके आणि राठी यांनी केला आहे.

हेही वाचा – ‘फुकटची कमाई बंद झाल्यामुळे आता ते प्रेम कसे करतील?’; इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांना टोला

जंतर-मंतर येथील आंदोलनाला पोलीस परवानगी मिळणार का?
सीजेपीचे सह-संयोजक सौरव दास यांनी 10 ऑक्टोबर रोजी जंतर-मंतरवर होणाऱ्या निदर्शनाबाबत संसद मार्ग पोलीस ठाण्यात लेखी माहिती सादर केली आहे. या आंदोलनात देशभरातून हजारो नागरिक सहभागी होतील, असा दावा पक्षाकडून केला जात आहे. मात्र, दिल्ली पोलिसांच्या नवीन नियमांनुसार कोणत्याही आंदोलनासाठी किमान 10 दिवसांची पूर्वपरवानगी आणि जास्तीत जास्त 1000 लोकांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे या आंदोलनाला पोलीस परवानगी देतात की नाही, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

केंद्राच्या धोरणांविरोधात विरोधकांची एकजूट
ध्रुव राठी, प्रकाश राज आणि सीजेपीच्या या संयुक्त आंदोलनामुळे निवडणूक आयोगाच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. देशातील तरुण आणि नागरी समाजाला सोबत घेऊन उभारण्यात येत असलेले हे आंदोलन येत्या काळात केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते. दिल्लीतील 10 ऑक्टोबरच्या आंदोलनानंतर या लढाईला काय वळण मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा – मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या सुरक्षेत मोठी वाढ; दिल्लीतील निवास्थानाबाहेर 50 जवानांचा पहारा

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number