मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभारावर जोरदार आक्षेप घेत विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ (INDIA) आघाडीने आपले आंदोलन अधिक तीव्र केले आहे. ज्ञानेश कुमार यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी विरोधकांनी दिल्लीत सलग 3 दिवस जोरदार निदर्शने केली. या आंदोलनाचा पुढील भाग म्हणून आता ‘इंडिया’ आघाडीचे प्रतिनिधी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात अधिकृत तक्रार नोंदवणार आहेत. या महत्त्वाच्या भेटीसाठी विरोधी पक्षांच्या 10 प्रमुख नेत्यांचे एक विशेष शिष्टमंडळ तयार करण्यात आले असून, गुरुवारी 4 थ्या दिवशीही दिल्लीच्या रस्त्यांवर विरोधकांचा निषेध मोर्चा निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
10 दिग्गजांच्या शिष्टमंडळात प्रमुख नेत्यांचा समावेश
राष्ट्रपतींना भेटणाऱ्या या 10 सदस्यीय शिष्टमंडळात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, राजदचे तेजस्वी यादव, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे, तसेच डाव्या पक्षांचे आणि आययूएमएलचे (IUML) प्रतिनिधी समाविष्ट आहेत. मात्र, या शिष्टमंडळात नाव असूनही उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत उपस्थित राहणार का, याबद्दल साशंकता आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवसानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांनी या निदर्शनांकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले असून, राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही त्यांचा प्रतिनिधी अनुपस्थित राहण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
हेही वाचा – मोठी बातमी! देशभरातून दिल्लीत येणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द; CJP आंदोलनाचे ‘साईड इफेक्ट’?
57 मेट्रो स्टेशन्स बंद अन् अनेक ट्रेन्स रद्द
दरम्यान, ‘सीजेपी’ (CJP) या संघटनेने 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीत ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी मोठ्या आंदोलनाची हाक दिली आहे. दिल्ली पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली असली, तरी आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून दिल्लीतील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकांवर येणाऱ्या अनेक मेल व एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय खबरदारीचा उपाय म्हणून दिल्लीतील सुमारे 57 मेट्रो स्थानके बंद ठेवण्यात आली असून, रात्री 9 वाजल्यापासून मेट्रो सेवा पूर्णपणे खंडित करण्यात आली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.