लाखो पर्यटकांचे आवडते आणि प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यातून एक धक्कादायक आणि संतापनजक प्रकार समोर आलेला आहे. भुशी डॅम परिसरात विक्रीसाठी असलेल्या लिंबू सरबतासाठी थेट धबधब्याच्या दुषित पाण्याचा वापर होत असल्याचे उघड झाले. पर्यटनासाठी आलेल्या एका जागरुक व्यक्तीने हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कॅमेऱ्यात कैद केलेला आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, सांडव्यावरुन वाहणारे घाण पाणी चक्क सरबतासाठी वापरत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दररोज लोणावळ्यात हजारो संख्येने पर्यटक येत असतात आणि त्या सर्वांची पहिली पसंती ही भुशी डॅम परिसरच असतो. मात्र, येथील काही बेकायदेशीर असलेले विक्रेते थेट पर्यटकांच्या आरोग्याशीच खेळत असल्याचे या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधून समोर आलेले आहे.
या प्रकारामुळे आता पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोणावळा नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने संबंधित विक्रेत्यांवर कठोर कारवाी करावी, अशी मागणी होत आहे शिवाय पर्यटकांनी या पुढे खाद्यपदार्थ खरेदी करत असताना सतर्क राहावे, असेही आवाहन केले जात आहे.