रत्नागिरी जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आलेली आहे. कोळंबे येथील धोकादायक असलेल्या डोहात बुडून कल्याणच्या क्रिकेट अकॅडमीमधील दोन 16 वर्षीय क्रिकेटपटूंचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. सौरव पवनकुमार झा आणि शुभम रमेश यादव अशी मृत पावलेल्या दोन्ही मुलांची नावे आहेत. हे दोघेही मूळचे कल्याण-मुंबई परिसरातील रहिवासी होते.
एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे या ठिकाणी 16 वर्षांखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. याच स्पर्धेसाठी कल्याण मधून एका प्रसिद्ध क्रिकेट अकॅडमीची टीम ही रत्नागिरीत आली होती. गुरुवारी त्यांचा सामना संपल्यावर सौरव, शुभम आणि काही त्यांचे सहकारी मैदानाजवळ असलेल्या एका डोहावर गेले. उन्हामुळे मुलांना पाण्यात पोहण्याचा मोह आवरला नाही आणि ते त्या डोहात उतरले.
हेही वाचा-सणासुदीला मिठाई खरेदी करताय? आधी हे पाहा…; गुलाबजामच्या पाकात पोहोतोय चक्क उंदीर
धोक्याच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष
धक्कादायक बाब म्हणजे, या डोहात पोहण्यास पूर्णपणे मनाई आहे. होड हा अत्यंत खोल आणि धोकादायक असल्याने स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने तिथे जाण्यास बंदी घातली आहे. संबंधित ठिकाणाच्या आसपासच्या भागात धोक्याचे फलकही लावले आहेत. मात्र, या फलकांकडे दुर्लक्ष करुन दोघे पाण्यात उतरले.
काही क्षणात दोघेही पाण्यात बुडाले आणि बाहेर आलेच नाहीत. दोघांना पाहताच्या त्यांच्या मित्रांनी आरडाओरड करताच स्थानिकांनी तातडीने तिथं धाव घेतली. दोघांनाही पाण्यातून बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळल्यानंतर पूर्णगड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले असून या घटेमुळे गावात शोककळा पसरली आहे.