महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण सामाजिक निर्णय घेतला आहे. राज्यातील गरीब, कष्टकरी आणि शेतकरी वर्गाला दुष्काळाच्या संकटातून दिलासा देण्यासाठी मंदिर समितीच्या वतीने ‘मुख्यमंत्री सहायता निधी’स 2 कोटी रुपयांची भरीव मदत जाहीर करण्यात आली आहे. मंदिर समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या मदतीचा धनादेश लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला जाणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सह-अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.
14 नोव्हेंबरपासून श्री विठ्ठल-रुक्मिणीचे 24 तास दर्शन सुरू
दुष्काळ निवारणाच्या या ऐतिहासिक निर्णयासोबतच मंदिर समितीने पंढरीच्या वारकऱ्यांसाठी आणखी एक मोठा दिलासा देणारी घोषणा केली आहे. आगामी कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांची होणारी अलोट गर्दी विचारात घेऊन येत्या 14 नोव्हेंबरपासून श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन २४ तास खुले ठेवण्यात येणार आहे. 24 तास दर्शन व्यवस्था सुरू झाल्यामुळे कार्तिकी यात्रेसाठी पंढरपुरात दाखल होणाऱ्या लाखो वारकऱ्यांना आणि भाविकांना रांगेत जास्त वेळ न थांबता सुलभ, सुरक्षित आणि जलद रीतीने देवाचे दर्शन घेणे शक्य होणार आहे.
हेही वाचा – मोठी बातमी! देशभरातून दिल्लीत येणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द; CJP आंदोलनाचे ‘साईड इफेक्ट’?
विठ्ठल मंदिराचा सामाजिक व वारकरी हिताचा स्तुत्य उपक्रम
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती नेहमीच धार्मिक कार्यांसोबत विविध सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर राहिली आहे. राज्यातील जनतेवर जेव्हा जेव्हा नैसर्गिक अथवा आर्थिक संकटे आली आहेत, तेव्हा मंदिर समितीने सामाजिक बांधिलकी जपत पुढाकार घेतला आहे. यंदाच्या दुष्काळात 2 कोटी रुपयांचे योगदान देऊन मंदिर समितीने पुन्हा एकदा भक्तांप्रती असलेली आस्था आणि सामाजिक जबाबदारी सिद्ध केली आहे. या निर्णयामुळे संपूर्ण वारकरी संप्रदायातून आणि नागरिकांमधून मंदिर समितीच्या भूमिकेचे मोठे कौतुक केले जात आहे.