इस्रायलची राजधानी तेल अवीव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनानंतर भारत-इस्रायल संबंधांना नवे सामरिक परिमाण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांदरम्यान महत्त्वपूर्ण संरक्षण करार होण्याची चर्चा असून, यावेळी थेट शस्त्र खरेदी करण्याऐवजी अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणावर भारताचा विशेष भर असणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
सध्याच्या अस्थिर जागतिक परिस्थितीत विश्वासार्ह भागीदार देशांमधील संरक्षण सहकार्य अधिक मजबूत असणे आवश्यक असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी इस्रायली संसद केनेस्सेटमधील भाषणात स्पष्ट केले. त्यांच्या वक्तव्याचा रोख संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याकडे असल्याचे मानले जात आहे. रशिया आणि फ्रान्सनंतर इस्रायल हा भारताचा महत्त्वाचा संरक्षण भागीदार देश बनला असून आधुनिक युद्धतंत्रज्ञान आणि अत्याधुनिक संरक्षण प्रणालींसाठी इस्रायलची जगभर ओळख आहे.
भारताची भूमिका यावेळी केवळ शस्त्र आयात करण्यापुरती मर्यादित नसून ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवण्यावर केंद्रित आहे. त्यामुळे इस्रायलने आतापर्यंत इतर देशांना उपलब्ध न करून दिलेले प्रगत संरक्षण तंत्रज्ञान भारताला द्यावे, अशी भारताची अपेक्षा आहे. यामुळे भविष्यात संरक्षण उपकरणांचे उत्पादन भारतातच करण्याचा मार्ग अधिक सुकर होऊ शकतो.
हेही वाचा: PM Narendra Modi: इतिहास घडला! इस्रायलच्या संसदेत 'मोदी-मोदी'चा जयघोष; पॅलेस्टाईनकडून सर्वोच्च सन्मान मिळवणारे मोदी ठरले 'जागतिक नेते'
माहितीनुसार प्रस्तावित संरक्षण करार दोन प्रमुख भागांत विभागला जाऊ शकतो. पहिला भाग संरक्षण प्रणालींमध्ये संयुक्त सहकार्याशी संबंधित असून दुसरा भाग आक्रमक शस्त्र प्रणालींच्या विकासासाठी भागीदारीवर आधारित असू शकतो. या चर्चेत इस्रायलमधील अग्रगण्य संरक्षण कंपन्यांच्या अत्याधुनिक प्रणालींवर विशेष भर दिला जाण्याची शक्यता आहे.
यामध्ये इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजचे एरो क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली, राफेल ॲडव्हान्स्ड डिफेन्स सिस्टम्सने विकसित केलेली डेव्हिड्स स्लिंग प्रणाली तसेच जगप्रसिद्ध आयरन डोम हवाई संरक्षण प्रणाली यांचा समावेश असू शकतो. याशिवाय राफेल आणि एल्बिट सिस्टम्स यांनी विकसित केलेली आयरन बीम ही लेझर आधारित संरक्षण प्रणालीही चर्चेत असून ती सुमारे 10 किलोमीटरपर्यंतच्या हवाई धोक्यांचा अचूक नाश करण्यास सक्षम मानली जाते.
या संभाव्य करारामुळे भारत-इस्रायल संरक्षण सहकार्य नव्या उंचीवर पोहोचण्याची शक्यता असून भविष्यात भारताच्या स्वदेशी संरक्षण उत्पादन क्षमतेला मोठी चालना मिळू शकते. बदलत्या जागतिक सुरक्षा समीकरणांच्या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञानाधारित संरक्षण भागीदारी भारतासाठी अत्यंत निर्णायक ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
हेही वाचा: Maharashtra Weather Update: ढगाळ वातावरण, वाढती उष्णता आणि अवकाळी पाऊस; पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे