Indigo Flight Cancellation : कर्नाटकमधील हुबळी येथे एक अनोखा आणि अनपेक्षित प्रसंग पाहायला मिळाला. देशभरात इंडिगोची विमानं मोठ्या संख्येने रद्द झाल्यामुळे नवविवाहित (Newlywed Techie Couple Hubballi, Karnataka) जोडप्याला त्यांच्या स्वतःच्या रिसेप्शनला व्हर्च्युअली हजेरी (Virtually Present in Reception) लावावी लागली. हुबळीची मेधा क्षीरसागर आणि ओडिशाच्या भुवनेश्वरमधील संगमा दास या दोन्ही नववधू-वरांचे रिसेप्शन हुबळीच्या गुजरात भवनमध्ये आयोजित केले होते. हे दोघेही बंगळूरुमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर (Bengaluru Software Engineer Couple) म्हणून काम करतात.
वारंवार उशीर आणि विमान रद्द
या जोडप्याने 23 नोव्हेंबरला भुवनेश्वरमध्ये लग्न केले होते आणि बुधवारी वधूच्या मूळ गावी औपचारिक स्वागत समारंभ आयोजित केला होता. 2 डिसेंबरसाठी त्यांनी भुवनेश्वरहून बंगळूरु आणि पुढे हुबळीसाठी तिकीट बुक केले होते. मात्र, इंडिगोच्या पायलटच्या (Indigo Pilots) कमतरतेमुळे त्यांची उड्डाणे वारंवार विलंबित (Indigo Flights Delayed) होत राहिली. मंगळवारी सकाळी 9 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत उड्डाणांना उशीर झाला आणि अखेरीस 3 डिसेंबरला ते विमान रद्द झाले.
नातेवाईकांनाही विमान रद्द झाल्याचा फटका
केवळ वधू-वरांनाच नाही, तर भुवनेश्वर-मुंबई-हुबळी या मार्गाने प्रवास करणाऱ्या अनेक नातेवाईकांनाही उड्डाणे रद्द झाल्याचा सामना करावा लागला. आधीच पाहुणे (Guests) जमा झाले होते आणि सर्व तयारी पूर्ण झाली होती. त्यामुळे कोणताही बदल करणे शक्य नव्हते. त्यामुळे वधू-वरांच्या जागी वधूच्या पालकांनी बसून रिसेप्शनचे विधी (Rituals) पार पाडण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा - Indigo Airlines: पुण्याला जाण्यासाठी नागपूरवरुन विमानाने उड्डाण केलं पण... इंडिगोच्या ढिसाळ कारभारचा प्रवाशाला फटका
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी
भुवनेश्वरमध्ये लग्नाच्या पोशाखात तयार असलेल्या वधू-वराने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे रिसेप्शनमध्ये हजेरी लावली आणि पडद्यावर त्यांचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. वधूच्या आईने सांगितले, "लग्न 23 नोव्हेंबरला झाले आणि आम्ही 3 डिसेंबरला रिसेप्शनची योजना आखली होती. पण अचानक पहाटे 4 वाजता विमान रद्द झाले. आम्हाला खूप वाईट वाटले, आम्ही इतक्या नातेवाईकांना आमंत्रित केले होते आणि शेवटच्या क्षणी कार्यक्रम रद्द करणे अशक्य होते."
नियम बदलण्यात अपयश: 500 हून अधिक उड्डाणे रद्द
इंडिगोने नवीन FDTL (Flight Duty Time Limitations) नियम सामावून घेण्यासाठी आपल्या रोस्टर प्लॅनिंगमध्ये (IndiGo Roster Planning) पुरेसे बदल न केल्यामुळे या आठवड्यात देशभरात शेकडो उड्डाणे रद्द केली आहेत. दिल्ली, जयपूर, भोपाळ, मुंबई, बेंगळूरु, हैदराबाद आणि चेन्नई यांसारख्या शहरांमध्ये विमान सेवा विस्कळीत झाली असून, हजारो प्रवासी अडकून पडले आहेत. कंपनी दररोज सुमारे 2 हजार 200 उड्डाणे चालवते, पण गुरुवारी इंडिगोने 500 हून अधिक उड्डाणे रद्द केली, जी तिच्या 20 वर्षांच्या इतिहासातील एका दिवसातील सर्वात मोठी संख्या आहे.
फेब्रुवारी 10 पर्यंत सेवा सामान्य होणार?
इंडिगोने DGCA ला माहिती दिली आहे की, FDTL नियमांच्या दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी करताना झालेल्या गैरसमज आणि नियोजनातील त्रुटींमुळेच हा गोंधळ झाला. कंपनीने पुढील वर्षी 10 फेब्रुवारीपर्यंत ऑपरेशन्स पूर्णपणे स्थिर होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे आणि उड्डाण कर्तव्य नियमांमध्ये तात्पुरती सूट (Temporary Relaxations in Flight Duty Rules) मागितली आहे. इंडिगोने DGCA ला असेही कळवले आहे की, 8 डिसेंबरपर्यंत आणखी उड्डाणे रद्द केली जातील आणि त्यानंतर सेवांमध्येही कपात केली जाईल.
हेही वाचा - IndiGo Flight Cancel: पायलट ड्यूटीत DGCA दिली थोडी सूट; इंडिगोचा गोंधळ नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न