गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील खावडा सोलर पार्क परिसरात एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी रस्ता अपघात घडला आहे. खावडा पोलीस चेक-पोस्टपासून सोलर पार्कच्या दिशेने जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर कामगारांना घेऊन जाणाऱ्या बोलेरो गाडीची आणि एका भरधाव ट्रेलरची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात 7 कामगारांचा घटनास्थळीच करुण अंत झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
बोलेरोमधून 15 हून अधिक कामगारांचा प्रवास; परिसरात आक्रोश
मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी बोलेरो गाडीमधून 15 हून अधिक कामगार सोलर पार्ककडे प्रवासासाठी निघाले होते. बोलेरो आणि ट्रेलरची धडक इतकी भीषण होती की गाडीचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातानंतर घटनास्थळी कामगारांचा आक्रोश आणि किंकाळ्या ऐकू येत होत्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. मृतांचे मृतदेह सुरुवातीला खावडा येथे आणण्यात आले असून पुढील शवविच्छेदनासाठी भुज येथील सामान्य रुग्णालयात पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सोलर पार्क परिसरातील पहिलाच मोठा अपघात
खावडा येथील जगप्रसिद्ध सोलर पार्क परिसरातील हा आतापर्यंतचा पहिलाच सर्वात मोठा भीषण अपघात असल्याचे स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मध्यरात्रीच्या सुमारास दृश्यमानता कमी असल्याने अथवा वाहनाचा वेग जास्त असल्याने हा अपघात घडला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. खावडा पोलीस ठाण्याच्या पथकाने या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अपघाताच्या अचूक कारणाचा शोध घेण्यासाठी सखोल तपास सुरू केला आहे.
हेही वाचा – गावकऱ्यांनी दिला होता इशारा, मुलांनी ऐकलं नाही! कल्याणच्या दोन क्रिकेटपटूंसोबत रत्नागिरीत काय घडलं?
भावनगर अपघाताच्या ताज्या आठवणी पुन्हा ताज्या
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील तळाजा तालुक्यातील त्रापाज गावाजवळ भावनगर-सोमनाथ राष्ट्रीय महामार्गावर असाच एक भीषण अपघात घडला होता. तिथे एका भरधाव बोलेरोने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रेलरला मागून जोरदार धडक दिली होती, ज्यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला होता. ते सर्व मृत अलंग येथील शिपयार्डमध्ये काम करणारे कामगार होते. या ताज्या घटनेमुळे गुजरातमध्ये रस्ते अपघातांचा आणि कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.