2025 चा नोबेल शांतता पुरस्कार मिळवणाऱ्या आणि गेल्या दोन दशकांहून अधिक काळ व्हेनेझुएलामध्ये लोकशाही पुनर्स्थापनेसाठी झगडणाऱ्या मारिया कोरीना माचाडो यांनी भारताचं मनापासून कौतुक केलं आहे. त्यांनी भारताला “महान लोकशाही” आणि “इतर देशांसाठी आदर्श उदाहरण” असलेले राष्ट्र म्हटलं आहे.
एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत माचाडो म्हणाल्या की, “भारत एक महान लोकशाही राष्ट्र आहे आणि आम्ही लोकशाही स्थापन केल्यानंतर भारत आमचा एक चांगला सहयोगी ठरू शकतो.” त्यांनी सांगितले की, “मी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधू इच्छिते आणि मला त्यांचे एका स्वतंत्र व्हेनेझुएलामध्ये त्यांचे स्वागत करायला आवडेल.”
भारताबद्दल बोलताना माचाडो म्हणाल्या, “भारताने अनेक देशांसाठी आणि पिढ्यांसाठी लोकशाहीचं एक उत्तम उदाहरण घालून दिलं आहे. ही मोठी जबाबदारी आहे कारण जगातील अनेक लोक भारताकडे प्रेरणेने पाहतात.” त्यांनी हेही स्पष्ट केलं की, “लोकशाही कधीही गृहित धरू नये, ती नेहमीच बळकट केली पाहिजे.”
हेही वाचा: AI Layoffs: धोक्याची घंटा! मेटा, गुगल आणि अमेझॉनसह प्रमुख टेक कंपन्यांनी AI शी संबंधित नोकऱ्यांवर लावला ‘ब्रेक’
माचाडो यांनी सांगितले की त्या महात्मा गांधींच्या अहिंसेच्या विचारांनी प्रेरित झाल्या आहेत. “शांततेचा मार्ग म्हणजे कमजोरी नाही गांधींनी जगाला हे दाखवून दिलं,” असं त्या म्हणाल्या.
त्या म्हणाल्या, “आम्हाला भारताचा आवाज हवा आहे. एक महान लोकशाही म्हणून व्हेनेझुएलाच्या नागरिकांच्या हक्कांसाठी उभं राहण्यासाठी. एकदा आमच्या देशात लोकशाही पुन्हा प्रस्थापित झाली की, भारताच्या कंपन्यांसाठी ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि दूरसंचार क्षेत्रात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील.”
माचाडो यांनी शेवटी सांगितलं की, “मला भारताविषयी अपार आदर आहे. माझी मुलगी काही महिन्यांपूर्वी भारतात आली होती आणि तिला तो देश खूप आवडला. मलाही एक दिवस भारत भेट द्यायला आवडेल.”
हेही वाचा: Murlidhar Mohol Meet CM Fadnavis: पुण्यातील राजकीय वातावरण तापलं, मुरलीधर मोहोळांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट