Explosion In Firecracker Factory: आंध्र प्रदेशातील बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील व्ही सवरम गावात बुधवारी दुपारी फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. याच किमान 6 जणांचा मृत्यू झाला असून 8 जण जखमी झाले. मृतांमध्ये 4 महिला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही दुर्घटना दुपारी सुमारे 12:30 वाजता रायावरम ब्लॉकमधील लक्ष्मी गणपती फायर वर्क्स या कारखान्यात घडली. त्या वेळी सुमारे 40 कामगार दिवाळी सणासाठी फटाके तयार करण्याचे काम करत होते. स्फोट इतका जोरदार होता की कारखान्याच्या शेडच्या भिंती कोसळल्या आणि काही सेकंदांतच आग भडकली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, 'स्फोटामुळे मोठ्या प्रमाणात आग लागली. काही कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकले असावेत.'
बचावकार्य सुरू
जिल्हा पोलीस अधीक्षक राहुल मीणा यांनी सांगितले की, सध्या आम्हाला 6 जळालेले मृतदेह सापडले आहेत. ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. जखमींपैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना अनापर्थी सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले आहे, तर काहींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारखान्याचे मालक वेलीगुबंतला सत्यनारायण मूर्ती (उर्फ सत्तीबाबू) हेही बळींमध्ये असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी बचाव आणि आग विझवण्याचे कार्य करत आहे.
हेही वाचा - IndiGo Fined: इंडिगोला DGCA चा मोठा दणका! पायलट प्रशिक्षणातील त्रुटींसाठी ठोठावला 20 लाख रुपयांचा दंड
सुरक्षा तपासणीवर प्रश्नचिन्ह
जिल्हाधिकारी महेश कुमार यांनी सांगितले की, फक्त एक आठवड्यापूर्वीच स्थानिक पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांनी या युनिटची पाहणी केली होती. तसेच सर्व सुरक्षा उपाययोजना अस्तित्वात आहेत, असा अहवाल दिला होता. आता आम्ही कारखान्यात अग्निसुरक्षा उपकरणे नीट कार्यरत होती का? आणि ती नियमांनुसार वापरली गेली का? याचा तपास करत आहोत.
दरम्यान, मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून जिल्हा प्रशासनाकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. त्यांनी जखमींना तत्काळ उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत. तथापी, अनपार्थीचे आमदार नल्लामिल्ली रामकृष्ण रेड्डी यांनी सांगितले, सत्यनारायण मूर्ती आणि त्यांचे कुटुंब गेल्या 70 वर्षांपासून फटाके व्यवसायात आहे. त्यांनी नेहमीच सुरक्षिततेची काळजी घेतली, पण इतक्या अनुभवी व्यक्तीलाही या अपघातात प्राण गमवावे लागले हे अत्यंत वेदनादायक आहे. राज्याच्या गृहमंत्री वंगालपुडी अनिता यांनीही घटनेबद्दल शोक व्यक्त केला आणि जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच अग्निशमन विभागाशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला.
हेही वाचा - Cough Syrup Controversy: 'हा दोषारोपाचा खेळ नाही, तामिळनाडू कारवाईत अपयशी'; कफ सिरप वादावर केंद्राचे स्पष्ट विधान
स्फोटाचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. मात्र, पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला असून स्फोट रासायनिक प्रतिक्रिया, निष्काळजीपणा किंवा सुरक्षा त्रुटींमुळे झाला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक तज्ञांची टीम पोहोचली असून अहवालाच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येणार आहे.