मुंबई इंडियन्सला आयपीएल 2026 मध्ये सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. गुरुवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जने मुंबईवर 7 विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला. क्विंटन डी कॉकच्या शतकी खेळीमुळे मुंबईने 195 धावांपर्यंत मजल मारली होती, पण पंजाबच्या फलंदाजांनी हे लक्ष्य सहज गाठले. प्रभसिमरन सिंग आणि श्रेयस अय्यर यांनी आक्रमक फलंदाजी करत पंजाबला 21 चेंडू राखून विजय मिळवून दिला.
मुंबईच्या पराभवामागे सर्वात मोठे कारण ठरले ते सलामीवीर रायन रिकेल्टनचे अपयश. क्विंटन डी कॉकसोबत डावाची सुरुवात करणाऱ्या रिकेल्टनकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती, पण तो केवळ 2 धावा करून बाद झाला. त्याने 8 चेंडू खेळले आणि अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर माघारी परतला.
रायन रिकेल्टननंतर फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमार यादवकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मुंबईच्या मैदानावर खेळण्याचा त्याला चांगला अनुभव आहे, पण तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. सूर्यकुमारला देखील अर्शदीप सिंगनेच बाद केले. त्याच्या अपयशामुळे मुंबईवर सुरुवातीपासून दबाव आला.
हेही वाचा: Raj Thackeray On Ashok Kharat Case: ‘कुणाची तरी वाट लावण्यासाठी प्रकरणं बाहेर काढली...’; भोंदू खरात प्रकरणावर राज ठाकरे आक्रमक
कर्णधार हार्दिक पंड्याही या सामन्यात पूर्णपणे अपयशी ठरला. नमन धीर बाद झाल्यानंतर हार्दिक फलंदाजीला आला, पण त्याने 12 चेंडूत फक्त 14 धावा केल्या. गोलंदाजीतही तो खूप महागडा ठरला. त्याने 3 षटकांत 39 धावा दिल्या. त्यामुळे पंजाबच्या फलंदाजांवर दबाव निर्माण करण्यात मुंबईला अपयश आले.
जसप्रीत बुमराहकडून मुंबईला मोठ्या अपेक्षा होत्या, पण तो पुन्हा एकदा विकेटविना राहिला. आयपीएल 2026 मध्ये 5 सामने खेळूनही बुमराहला अजून एकही विकेट मिळालेली नाही. त्याच्यासोबत दीपक चाहरही प्रभाव पाडू शकला नाही. दीपकने 2.3 षटकांत 45 धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही. मुंबईच्या अनुभवी गोलंदाजांनी खराब कामगिरी केल्यामुळे पंजाबने सहज विजय मिळवला.
हेही वाचा: Noida Violence: नोएडा हिंसाचारामागे पाकिस्तानचे 'सोशल' षड्यंत्र; कामगार आंदोलनात दंगल घडवण्यासाठी वापरला हा मार्ग, पोलिसांचा मोठा खुलासा