Tuesday, May 20, 2025 03:55:37 PM

सैरावैरा पळणारे पर्यटक अन् गोळीबाराचा भीषण आवाज; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आणखी एक VIDEO

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत महिला, मुले, घाबरलेले पर्यटक स्थानिक टूर ऑपरेटर आणि मार्गदर्शकांसोबत एकत्र बसलेले दिसत आहेत. दुसऱ्या व्हिडिओत एक बेसावध पर्यटक 'रोप वे'चा आनंद घेत आहे.

सैरावैरा पळणारे पर्यटक अन् गोळीबाराचा भीषण आवाज पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आणखी एक video

New Video Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आणखी एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. पर्यटक काही लहान मुले निसर्गाचा आणि सहलीचा आनंद घेताना दिसत आहेत. यामध्ये पर्यटकांचा घोळका दिसत असून मागून गोळीबाराचाही आवाज ऐकू येत आहे. दुसऱ्या व्हिडिओत एक पर्यटक रोप वे वरून जाण्याचा आनंद घेताना दिसत आहे. हाच पर्यटकाच्या कॅमेऱ्यातून हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. हे दोन्ही व्हिडिओ 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यादरम्यानचा आहे. या हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला होता.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये महिला आणि मुलांसह घाबरलेले पर्यटक स्थानिक टूर ऑपरेटर आणि मार्गदर्शकांसोबत एकत्र बसलेले दिसत आहेत. व्हिडिओमध्ये पर्यटकांचे घाबरलेले आवाज ऐकू येत आहेत. तर, स्थानिक लोक हल्लेखोरांपासून लपून राहण्यासाठी त्यांना वाकून राहण्यास सांगत असल्याचे ऐकू येते. गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर हल्ल्याचे असे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, त्यापैकी काही व्हिडिओंमध्ये दहशतवादी बंदुका घेऊन पर्यटकांवर गोळीबार करताना दिसत होते. हे व्हिडिओ पाहून अस्वस्थ वाटू लागते आणि दहशतवाद्यांविरोधात प्रचंड चीड निर्माण होते.

हेही वाचा - पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीची छाया.. हे ट्रेंडस् आणि कीवर्डस सर्वाधिक गुगल सर्च

दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार
पहलगामच्या निसर्गरम्य बैसरन खोऱ्यात हा दहशतवादी हल्ला झाला, जिथे पर्यटक पोनी राईड्स आणि इतर अॅक्टिव्हिटिजचा आनंद घेत होते. कुरणाच्या सभोवतालच्या पाइन जंगलातून लष्करी पोशाखात बंदूकधारी दहशतवादी बाहेर आले आणि त्यांनी पर्यटकांना लक्ष्य केलं. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, पुरुष पर्यटकांना वेगळे करण्यात आले, तर काहींनी सांगितलं की, धर्म विचारून या दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. कलमा येत असणाऱ्या पर्यटकांना सोडून देण्यात आल्याचंही काहीजण म्हणाले.

तर, व्हायरल होत असलेल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये एक पर्यटक रोप वेचा आनंद घेत असताना खाली गोळीबार सुरू आहे. इतर पर्यटक सैरावैरा पळत आहेत. त्याच्या हे लक्षात येताच, त्याच्या चेहऱ्यावरचेही हावभाव बदलतात.

दहशतवाद्यांपासून आपला जीव वाचवून पळणाऱ्या पर्यटकांना येथील घोडेस्वारांनी आणि स्थानिकांनी मदत केली. काही व्हिडिओमध्ये तर स्थानिक लोकांनी पर्यटकांना पाठीवर बसवून मुख्य रस्त्यावर आणलं. सुरक्षा दलांना आणि बचाव पथकांना कुरणात पोहोचण्यासाठी बराच वेळ लागला. या रस्त्यावर फक्त पायी जाता येतं, येथून कोणतंही वाहन जाऊ शकत नाही.

भारताने केली पाकिस्तानची कोंडी
या हल्ल्याला भारताने पाकिस्तानला जबाबदार धरलं आहे. त्यामुळे पाकिस्तानविरोधात भारताने कडक पावलं उचलली आहेत. भारताने सिंधू जल करार रद्द केल्यामुळे भविष्यात पाकिस्तानला पाण्याच्या संकटाला सामोर जावे लागणारे आहे. भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसाही अवैध ठरवला आहे. तर, पाकिस्तानात राहणाऱ्या भारतीयांना मायदेशी येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भारताने पाकिस्तानची अनेक बाजूंनी कोंडी करण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा - फेकू शाहबाज शरीफ.. म्हणे, दहशतवादविरोधी लढाईत पाकिस्तानचं 600 अब्ज डॉलर्सचं नुकसान! लोक म्हणाले..

2019 मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर खोऱ्यातील हा सर्वात घातक हल्ला होता. पाकिस्तानस्थित बंदी घातलेल्या लष्कर-ए-तैयबा (एलईटी) च्या प्रॉक्सी असलेल्या रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने याची जबाबदारी स्वीकारली.


सम्बन्धित सामग्री