JDU Legislature Party Leader: बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचाली वेगाने सुरू असताना नितीश कुमार यांची जनता दल युनायटेड (जेडीयू) विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. पाटण्यात बुधवार झालेल्या पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बिहार विधानसभा निवडणूक 2025 मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) ने 243 पैकी तब्बल 202 जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले. त्यानंतर सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू असून 20 नोव्हेंबर रोजी नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन होणार आहे, अशी माहिती जेडीयू नेत्यांनी दिली.
हेही वाचा - Bangladesh Boats Seized: भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई; तीन बांगलादेशी बोटी जप्त, 79 मासेमारी करणारे अटकेत
जेडीयूच्या अंतर्गत बैठकीनंतर नितीश कुमार संध्याकाळी राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. एनडीएच्या सर्व मित्रपक्षांकडून मिळालेला पाठिंबा दर्शवणारे पत्र ते राज्यपालांकडे सादर करतील.
हेही वाचा - Delhi Blast Updates : दिल्ली स्फोटात पाकिस्तानाचाच हात, आत्मघातासाठी पाक हँडलरकडून उमरचं ब्रेनवॉश
नितीश कुमार दहाव्यांदा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ
नितीश कुमार 20 नोव्हेंबर रोजी विक्रमी 10व्या वेळेस बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. पाटण्याच्या गांधी मैदानावर सकाळी 11:30 वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अनेक केंद्रीय मंत्री तसेच एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे. शपथविधीपूर्वीच्या तयारीचा आढावा स्वतः नितीश कुमार यांनी घेतला असून राजधानी पाटणा आणि गांधी मैदान परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरक्षा तैनात करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. एनडीएच्या दमदार विजयामुळे आणि जेडीयूच्या विधिमंडळ पक्षाच्या निर्णयानंतर नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये नवे सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.