Friday, November 07, 2025 08:49:29 PM

Odisha News: कटकमध्ये हिंसाचारानंतर अनेक भागांत संचारबंदी लागू; नवीन पटनायक यांचे शांततेचे आवाहन

कटक शहरात दुर्गा पूजा मूर्ती विसर्जनादरम्यान झालेल्या हिंसेनंतर 36 तासांची संचारबंदी लागू केली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीबाबत विरोधी पक्षनेते नवीन पटनायक यांनी तीव्र चिंता व्यक्त केली.

odisha news कटकमध्ये हिंसाचारानंतर अनेक भागांत संचारबंदी लागू नवीन पटनायक यांचे शांततेचे आवाहन

कटक : कटक शहरात दुर्गा पूजा मूर्ती विसर्जनादरम्यान झालेल्या हिंसेनंतर 36 तासांची संचारबंदी (Curfew) लागू करण्यात आली आहे. रविवार (रात्री 10 वाजल्यापासून) 13 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर, तणावपूर्ण परिस्थिती पाहता, सोमवार संध्याकाळपर्यंत इंटरनेट सेवाही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

इंटरनेट आणि संचारबंदीचे निर्बंध
गृह विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार, कटक शहर, सीएमसी, सीडीए आणि बयालिश मौजा या भागांमध्ये प्रामुख्याने निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
इंटरनेट बंदी: रविवार संध्याकाळ 7 वाजेपासून सोमवार संध्याकाळ 7 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा निलंबित करण्यात आली आहे. व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट, एक्स (ट्विटर) सह सर्व सोशल मीडिया साइट्सवर या दरम्यान बंदी घालण्यात आली आहे. इंटरनेट सेवा पुरवठादार आणि ब्रॉडबँड सेवांवरही बंदी घालण्यात आली आहे.
संचारबंदीची अंमलबजावणी: रविवार रात्रभरानंतर सोमवार सकाळपासून कटकच्या विविध भागांत संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. पोलिस रस्त्यांवर सतत गस्त घालत आहेत.

हेही वाचा - Pilots' Union Demand: 'सर्व बोईंग 787 विमानांमध्ये...'; वैमानिक संघटनेने DGCA कडे केली 'ही' मोठी मागणी

आवश्यक सेवांना सूट; उपद्रवींवर कठोर कारवाईचा इशारा
पोलिस आयुक्त एस. देवदत्त सिंह यांनी माहिती दिली की, मेडिकल, हॉस्पिटल, पेट्रोल पंप आणि किराणा दुकाने यांसारख्या आवश्यक सेवांना संचारबंदीतून वगळण्यात आले आहे. त्यांनी उपद्रवी आणि अप्रिय परिस्थिती निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा दिला आहे.
सध्या स्थितीचा आढावा घेतला जात असून, त्यानुसार संचारबंदीचा कालावधी कमी-जास्त करण्याचा निर्णय घेतला जाईल. कटक शहरातील सर्व सरकारी कार्यालये आणि एससीबी मेडिकल कॉलेज सुरू आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी लोकांनी अनावश्यक घराबाहेर न पडण्याचे आणि बसची वाहतूक कमी करण्याचे आवाहन केले आहे.

नवीन पटनायक यांचे शांततेचे आवाहन
कटक शहरात निर्माण झालेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीबद्दल विरोधी पक्षनेते नवीन पटनायक यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी नागरिकांना शांतता आणि सलोखा राखण्याचे आवाहन केले. "ओडिशा शांतताप्रिय राज्य म्हणून ओळखले जाते आणि कटकच्या लोकांना शांतता व सलोखा हवा आहे," असे ते म्हणाले.

हेही वाचा - Mount Everest: माऊंट एव्हरेस्टवर अचानक हिमवादळ! हजारो ट्रेकर्स अडकले, अनेकांना हायपोथर्मियाचा त्रास


सम्बन्धित सामग्री