Sunday, May 10, 2026 07:18:13 PM

Rajiv Ghai: भारतीय लष्कराने पाकचे कंबरडं मोडलं; 'ऑपरेशन सिंदूर'च्या वर्षपूर्तीला लेफ्टनंट जनरल राजीव घईंचे मोठे विधान

‘ऑपरेशन सिंदूर’ला एक वर्ष पूर्ण होत असताना भारतीय लष्कराने दहशतवादाविरोधातील आपल्या आक्रमक भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे.

rajiv ghai भारतीय लष्कराने पाकचे कंबरडं मोडलं ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीला लेफ्टनंट जनरल राजीव घईंचे मोठे विधान

नवी दिल्ली: भारतीय सामरिक इतिहासातील अत्यंत निर्णायक वळण मानल्या जाणाऱ्या 'ऑपरेशन सिंदूर'ला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. या ऐतिहासिक मोहिमेच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी शत्रू राष्ट्राला कडक इशारा दिला आहे. "ऑपरेशन सिंदूरने हे सिद्ध केले आहे की, भारतीय सीमा ओलांडून दहशतवाद पसरवणाऱ्या कोणत्याही गटासाठी आता जगातील कोणताही कोपरा किंवा अड्डा सुरक्षित नाही," अशा शब्दांत त्यांनी भारताच्या बदलत्या आक्रमक धोरणाचे समर्थन केले.

दहशतवाद्यांच्या 'डेथ वॉरंट'वर स्वाक्षरी

7 मे 2025 रोजी भारतीय लष्कर, वायूसेना आणि नौदलाने एकाच वेळी पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राईक केला होता. 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 26 निरपराध पर्यटकांचा बळी गेला होता, त्याचा बदला म्हणून ही मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरचे 10 नातेवाईक आणि चार जवळच्या साथीदारांसह 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.

हवाई आणि भूदलाचा अचूक समन्वय

लेफ्टनंट जनरल घई यांनी माहिती दिली की, या मोहिमेदरम्यान एकूण नऊ अचूक प्रहार (Precision Strikes) करण्यात आले. यामध्ये भारतीय भूदलाने सात आणि भारतीय वायूसेनेने दोन मोहिमा अशा प्रकारे आखल्या होत्या की शत्रूला सावरण्याची संधीच मिळाली नाही. बहावलपूरमधील जैशचा 'मरकझ सुभान अल्लाह', कोटलीतील 'मरकझ अब्बास' आणि मुझफ्फराबादमधील 'सय्यदना बिलाल' यांसारख्या प्रमुख दहशतवादी तळांना भारतीय लष्कराने जमीनदोस्त केले होते.

हेही वाचा: RBI New Rule: पूर किंवा भूकंप आला तरी EMI चं टेन्शन मिटलं! कर्जदारांसाठी RBI ची सर्वात मोठी घोषणा 

आत्मनिर्भर भारताचा 'ब्रह्मोस' बाणा

या कारवाईत भारताच्या स्वदेशी बनावटीच्या शस्त्रास्त्रांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली, आकाश क्षेपणास्त्र आणि प्रगत पाळत ठेवणारी यंत्रणा यामुळेच ही मोहीम यशस्वी झाली. "ऑपरेशन सिंदूरने हे सिद्ध केले आहे की 'आत्मनिर्भरता' केवळ घोषणा नसून ते भारताचे शक्तीवर्धक साधन आहे. सध्या भारताची 65 टक्क्यांहून अधिक संरक्षण उपकरणे देशांतर्गत तयार होत आहेत, जे गौरवास्पद आहे," असेही घई यांनी नमूद केले.

अभेद्य हवाई सुरक्षा आणि अचूक नियोजन

भारतीय लष्कराने ही मोहीम राबवत असताना पाकिस्तानच्या प्रतिहल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारीही पूर्ण केली होती. भारताच्या अभेद्य 'एअर डिफेन्स' आर्किटेक्चरमुळे पाकिस्तानला भारताच्या लष्करी पायाभूत सुविधांचे कोणतेही नुकसान करता आले नाही. लष्कर, वायूसेना आणि नौदल यांच्यातील त्रिसदस्यीय समन्वयामुळे अत्यंत कमी वेळात ही जटिल मोहीम फत्ते झाली, ज्यामुळे भारताने आपली संरक्षण सिद्धता जगासमोर सिद्ध केली.

नव्या भारताचे आक्रमक धोरण

पहलगामच्या बलिदानाचा बदला घेण्यासाठी सुरू झालेले 'ऑपरेशन सिंदूर' हे जुन्या धोरणांना तिलांजली देणारे ठरले. केंद्र सरकारने लष्कराला मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. केवळ सीमावर्ती भागातच नव्हे, तर पाकिस्तानच्या गाभ्यात शिरून दहशतवाद्यांना टार्गेट करण्याचे धाडस भारताने या मोहिमेद्वारे दाखवले. यामुळे दक्षिण आशियातील सामरिक समीकरणे कायमची बदलली असून, भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना एक कठोर धडा मिळाला आहे.

हेही वाचा: Hindi Exam Postponed : सरकार नरमले! राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या हिंदी परीक्षेला स्थगिती; उदय सामंत यांची घोषणा


सम्बन्धित सामग्री