जर्मनीतील फ्रँकफर्टहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या (AI-2030) विमानात ‘Squawk-7500’ हायजैक अलर्ट वाजल्यामुळे बुधवारी 14 ऑक्टोबर रोजी मोठी खळबळ उडाली होती. समोर आलेल्या माहितीनुसार, 13 ऑक्टोबर रोजी रात्री 9:45 वाजता फ्रैंकफर्टहून उड्डाण केलेले हे विमान 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:40 वाजता दिल्लीत पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, अहमदाबाद एअर ट्रॅफिक कंट्रोलला विमानाचे अपहरण झाल्याचा सांकेतिक संदेश मिळाल्याने या विमानाची जयपूर विमानतळावर सुरक्षित आपत्कालीन लँडिंग करण्यात आली होती.
जयपूर विमानतळावर विमान उतरल्यानंतर त्याला मुख्य पार्किंग आणि इतर विमानांपासून दूर आयसोलेशन बेमध्ये ठेवण्यात आले होते. तसेच सुरक्षा पथके, श्वानपथक आणि बॉम्ब शोधक पथकाने आपले शर्थीचे शोधकार्य राबवले. सुरुवातीला पायलटकडून नजरचुकीने काही सेकंदांसाठी 7500 हा आपत्कालीन कोड सुरू झाला असावा असा अंदाज वर्तवला जात होता.
दरम्यान या प्रकरणात आता वैमानिकाच्या दाव्याने मोठा ट्विस्ट समोर आला आहे. प्राथमिक चौकशीदरम्यान वैमानिकाने “मी कोणतेही चुकीने बटण दाबलेले नाही,” असं म्हणतं त्याच्यावर लावण्यात आलेले सगळे आरोप फेटाळून लावले. त्यानंतर हा अलर्ट मेसेज विमानातील प्रणालीत निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे आपोआप जनरेट झाल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुमारे अडीच तास चाललेल्या कसून तपासणीनंतर सुरक्षा यंत्रणांना विमानात कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा हालचाल आढळलेली नाही. सर्व तपासणी पूर्ण झाल्यानंतर विमानाला त्या पायलटांसह दिल्लीसाठी उड्डाण करण्याची अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे.