Rahul Gandhi On PM Modi: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताज्या विधानानंतर भारतातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. ट्रम्प यांनी दावा केला की भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना वैयक्तिकरित्या आश्वासन दिले होते की भारत रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवेल. या दाव्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर तीव्र टीका केली असून, त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून म्हटले आहे की 'पंतप्रधान मोदी ट्रम्पला घाबरतात.' राहुल गांधींनी आपल्या पोस्टमध्ये यासाठी 5 कारणे दिली आहेत.
राहुल गांधींनी सांगितली 5 कारणे
यातील पहिलं कारण म्हणजे ट्रम्प भारताच्या धोरणांची घोषणा स्वतः करतात आणि मोदी त्यावर काही बोलत नाहीत. दुसरं म्हणजे ट्रम्पकडून दुर्लक्ष झालं तरी मोदी त्यांना सतत अभिनंदन संदेश पाठवतात. तिसरं कारण म्हणून राहुल यांनी अर्थमंत्र्यांचा अमेरिका दौरा रद्द झाल्याचा उल्लेख केला, तर चौथं कारण म्हणजे मोदी शर्म-अल-शेख परिषदेला उपस्थित राहिले नाहीत. पाचवं आणि शेवटचं कारण म्हणजे पंतप्रधान मोदी ‘ऑपरेशन सिंदूर’ला विरोध करत नाहीत, असं राहुल यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा -Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा; “मोदींनी खात्री दिलीय, भारत रशियाकडून तेल खरेदी थांबवेल”
दरम्यान, ट्रम्प यांनी वॉशिंग्टनमध्ये दिलेल्या निवेदनात सांगितले की भारत हळूहळू रशियन तेल खरेदी कमी करेल. त्यांनी म्हटलं, मोदींनी मला सांगितलं की ते तेल खरेदी करणे थांबवतील, पण लगेच नाही. मात्र, भारत सरकारकडून या दाव्याची कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही. वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासानेही या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
हेही वाचा - Donald Trump : ट्रम्पच्या टॅरिफविरोधात भारताला मिळणार स्वित्झर्लंडचा पाठिंबा! नवे व्यापार करार चर्चेत
काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनीदेखील ट्रम्पच्या दाव्यावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी लिहिले की, राष्ट्रपती ट्रम्प वॉशिंग्टनमध्ये बसून भारत सरकारचे निर्णय जाहीर करतात. पंतप्रधान मोदी त्यांचे कौतुक करणारे ट्विट करतात, पण अमेरिका भारतावर कर लादते. हे परराष्ट्र धोरणाचं अपयश आहे. दरम्यान, अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्या भारत दौर्यादरम्यान महिला पत्रकारांना पत्रकार परिषदेत प्रवेश नाकारल्याच्या घटनेवरूनही राहुल गांधींनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.