PM Modi's Letter to Nation on Diwali : भारतात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहाने आणि थाटामाटात साजरा होत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा देणारे एक खास पत्र लिहिले आहे. पंतप्रधान मोदींनी या पत्रातून दिवाळीच्या शुभेच्छांसोबतच काही महत्त्वाची आवाहनेही केली आहेत. तसेच, या पत्राद्वारे मोदींनी जनतेशी संवाद साधला असून, दिवाळीचा सण हा ऊर्जा, उत्साह आणि देशाच्या कामगिरीवर चिंतन करण्याचा काळ असल्याचे नमूद केले आहे.
पंतप्रधान मोदींनी देशवासियांना स्वदेशी वस्तूंचा स्वीकार करण्याचे, तसेच आरोग्याला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. तसेच, प्रत्येक भाषेचा आदर करण्याचे आवाहनही त्यांनी केले. याशिवाय, ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दलही त्यांनी भाष्य केले आहे. अयोध्यामध्ये राम मंदिर बांधल्यानंतरची ही दुसरी दिवाळी असल्याचे सांगत त्यांनी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी धार्मिकता आणि धैर्य याबद्दलच्या श्रीरामांच्या शिकवणींचा संदर्भ दिला आहे.
'अन्यायाचा सूड घेतला': मोदी
पंतप्रधान मोदींनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, “दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने तुम्हाला माझ्या मनापासून शुभेच्छा. अयोध्येत राम मंदिराच्या भव्य बांधकामानंतरची ही दुसरी दिवाळी आहे. भगवान श्री राम आपल्याला धार्मिकतेचं रक्षण करायला शिकवतात, तसेच अन्यायाविरुद्ध लढायलाही शिकवतात. याचे एक ज्वलंत उदाहरण आपण काही महिन्यांपूर्वी ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाहिले. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने अन्यायाचा बदला घेतला,” असे मोदींनी स्पष्ट केले.
मोदी म्हणाले, 'या दिवाळीला विशेष महत्त्व आहे, कारण...’
पंतप्रधान मोदी यांनी ही दिवाळी विशेष महत्त्वाची असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “ही दिवाळी खास आहे. कारण देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये, दुर्गम भागांमध्ये पहिल्यांदाच दिवाळीचे दिवे लावले जातील. हे असे जिल्हे आहेत, जिथे नक्षलवाद आणि माओवाद्यांचा नायनाट करण्यात आला आहे. अलीकडच्या काळात आपण पाहिले असेल की, किती नक्षलवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडला आहे आणि ते विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील झाले आहेत आणि त्यांनी देशाच्या संविधानावर विश्वास व्यक्त केला आहे. ही देशासाठी एक महत्त्वाची कामगिरी आहे.”
हेही वाचा - Toll Gate Open : दिवाळी बोनस कमी मिळाल्याने टोल कर्मचाऱ्यांचा संताप; हजारो गाड्या शुल्काशिवाय सोडल्या! कंपनीला लाखोंचा फटका
'स्वदेशी स्वीकारा आणि देशासाठी कर्तव्य पार पाडा'
पंतप्रधान मोदी म्हणाले, आपण स्वदेशीचा स्वीकार केला पाहिजे आणि ही बाब अभिमानाने सांगितली पाहिजे. 'एक भारत, श्रेष्ठ भारत' या भावनेला प्रोत्साहन दिलं पाहिजे. प्रत्येक भाषेचा आदर केला पाहिजे, स्वच्छतेचं पालन केलं पाहिजे, आरोग्याला प्राधान्य दिलं पाहिजे, आपल्या अन्नातील तेलाचं प्रमाण 10 टक्क्यांनी कमी केलं पाहिजे आणि योगासने केली पाहिजेत. हे सर्व प्रयत्न आपल्याला अधिक वेगाने विकसित होणाऱ्या भारताकडे घेऊन जातील,” असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले.
'भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्यासाठी सज्ज'
“अनेक संकटांचा सामना करणाऱ्या जगात आपला भारत स्थिरता आणि संवेदनशीलतेचं प्रतीक म्हणून ठाम उभा आहे. भविष्यात आपण जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यासाठी सज्ज आहोत,” असे सांगून मोदींनी नागरिकांच्या कर्तव्यावर भर दिला. ते म्हणाले, “विकसित आणि स्वावलंबी भारताच्या या प्रवासात नागरिक म्हणून आपली प्राथमिक जबाबदारी राष्ट्राप्रती असलेली कर्तव्ये पार पाडणे आहे.
देशाच्या आर्थिक प्रगतीबद्दल बोलताना मोदींनी जीएसटीच्या बदलांचा उल्लेख केला. “काही दिवसांपूर्वी जीएसटीबाबत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून जीएसटीचे कमी दर लागू झाले आहेत. जीएसटीच्या बचत महोत्सवामुळे देशवासीयांचे हजारो कोटी रुपयांची बचत होत आहे,” असेही मोदींनी पत्रात म्हटले.
हेही वाचा - H1B Visa: भारतीय तंत्रज्ञ आणि विद्यार्थ्यांसाठी आनंदाची वार्ता! अमेरिकेने H-1B व्हिसाच्या शुल्कवाढीच्या अटी केल्या शिथील