Scam in Azamgarh Jail: आझमगडमधील विभागीय तुरुंगातून मोठा आर्थिक घोटाळा समोर आला आहे. तुरुंग प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा फायदा घेत सुटकेनंतर एका कैद्याने तुरुंगाच्या अधिकृत खात्यातून अंदाजे 30 लाख रुपये काढल्याची घटना उघड झाली आहे. या घोटाळ्याने तुरुंग अधिकाऱ्यांना मोठा झटका बसला आहे. तथापी, पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
पत्नीच्या हत्येप्रकरणी तुरुंगवास
बिलारियागंज पोलिस स्टेशनच्या जमुआ शाहगड गावातील रहिवासी रामजीत यादव उर्फ संजय याला पत्नीच्या हत्येप्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. रामजीतला 24 फेब्रुवारी 2023 रोजी तुरुंगात दाखल करण्यात आले. तथापी, 20 मे 2024 रोजी त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. सुटकेदरम्यान, त्याने तुरुंग अधीक्षकांच्या नावावर चालवलेल्या कॅनरा बँकेच्या खात्याचे चेकबुक चोरले. सुटकेनंतर दुसऱ्या दिवशी, 21 मे 2024 रोजी, रामजीतने पहिल्यांदा 10,000 रुपये काढले. त्यानंतर 22 मे रोजी 50,000 रुपये, चार दिवसांनी 1.40 लाख रुपये, आणि 22 सप्टेंबर 2025 रोजी 2.60 लाख रुपये काढले. तो बँकेत बनावट स्वाक्षऱ्या वापरून पैसे काढत राहिला, तरी तुरुंग प्रशासनास याची कल्पनाही नव्हती.
हेही वाचा - Rajasthan Shocker : हृदयद्रावक घटना! पती-पत्नीच्या वादाची मुलांना शिक्षा; आईनं 4 मुलांसह केलं विष प्राशन, अन्...
चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
दरम्यान, खात्यातून पैसे गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर तुरुंग अधीक्षक आदित्य कुमार सिंग यांनी वरिष्ठ लेखा अधिकारी मुशीर अहमद यांची चौकशी केली. बँकेच्या अहवालानुसार, रामजीतने स्वतःला तुरुंग कंत्राटदार म्हणून दाखवून बनावट स्वाक्षरी वापरून पैसे काढले. तात्काळ कारवाई करत, तुरुंग अधीक्षकांनी आझमगड पोलीस ठाण्यात रामजीत यादव उर्फ संजय, शिव शंकर उर्फ गोरख, वरिष्ठ सहाय्यक मुशीर अहमद आणि चौकीदार अवधेश कुमार पांडे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला.
हेही वाचा - West Bengal: दुर्गापूर हादरलं! वैद्यकीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; नराधमाने जंगलात ओढत नेऊन केलं घृणास्पद कृत्य
सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चारही आरोपींची चौकशी सुरू केली आहे. तसेच गुन्ह्याच्या तपासासाठी सखोल चौकशी केली जात आहे. या घोटाळ्यामुळे तुरुंग प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. तथापी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तुरुंगात सुरक्षा उपाययोजना वाढवण्याचा आदेश दिला आहे. राज्यभरातील तुरुंग प्रशासनासाठी ही घटना सतर्कतेचा इशारा मानली जात आहे.