मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात केलेल्या कथित वक्तव्यामुळे दाखल मानहानी खटल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी भिवंडी न्यायालयात हजेरी लावली. यावेळी त्यांच्या वकिलांनी न्यायालयीन प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राहुल गांधी यांच्या जामिन्यासंदर्भातील आवश्यक कागदपत्रे न्यायालयासमोर सादर करण्यात आल्याची माहिती वकिलांनी दिली. न्यायालयाने ही कागदपत्रे स्वीकारली असून कायद्यातील तरतुदीनुसार नव्या जामिन्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
दरम्यान, या प्रकरणातील पूर्वीचे जामीनदार शिवराज पाटील चाकूरकर यांचे नुकतेच निधन झाल्याने नियमानुसार राहुल गांधी यांना नव्याने जामीन मिळवण्याची प्रक्रिया पार पाडावी लागली. त्यानुसार राहुल गांधी यांनी स्वतः भिवंडी न्यायालयात उपस्थित राहून जामीन बॉण्डवर स्वाक्षरी केली.
हेही वाचा: Budget Session 2026: विधिमंडळात उद्यापासून सत्तासंघर्षाचा नवा अंक; महायुती विरुद्ध मविआ, अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोणाचे पारडे जड?
सदर प्रकरण सध्या सुनावणीच्या टप्प्यात असून साक्षीदार क्रमांक दोन अशोक सायकर यांच्या उलटतपासणीची प्रक्रिया अपेक्षित होती. मात्र, त्याऐवजी न्यायालयात जामिन्याशी संबंधित औपचारिकता पूर्ण करण्यात आल्याचे वकिलांनी स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खासदार आणि आमदारांविरुद्ध प्रलंबित असलेली प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार भिवंडी न्यायालयातही या खटल्याची सुनावणी सुरू असल्याचे सांगण्यात आले.
सुनावणीदरम्यान कोणताही युक्तिवाद झाला नसून योग्य वेळी कायदेशीर बाजू मांडून सत्य न्यायालयासमोर आणले जाईल, असा विश्वास राहुल गांधी यांच्या कायदेशीर पथकाने व्यक्त केला. तसेच भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचेही त्यांच्या वकिलांनी नमूद केले.
राहुल गांधी यांच्यावरील आरोपांबाबतचे सत्य लवकरच न्यायालयीन प्रक्रियेतून समोर येईल, असा दावा देखील बचाव पक्षाकडून करण्यात आला आहे.
हेही वाचा: Maharashtra Weather Alert: राज्यावर पुन्हा अवकाळीचे सावट; विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा, 9 जिल्ह्यांना अलर्ट