Tuesday, March 17, 2026 02:29:09 PM

Rahul Gandhi on Tariff: 'आपण तेल कुठून घ्यायचे हे आता अमेरिका ठरवणार का?'; लोकसभेत राहुल गांधींनी सरकारला घेरले

अर्थसंकल्प 2026-27 वरील लोकसभेतील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर डेटा सुरक्षा, ऊर्जा धोरण आणि कृषी प्रश्नांवर तीव्र टीका केली.

rahul gandhi on tariff आपण तेल कुठून घ्यायचे हे आता अमेरिका ठरवणार का लोकसभेत राहुल गांधींनी सरकारला घेरले

नवी दिल्ली : संसदेत सुरू असलेल्या 'बजेट सेशन' दरम्यान आज लोकसभेतील वातावरण अत्यंत तापलेले पाहायला मिळाले. अर्थसंकल्प 2026-27 (Union Budget 2026-27) वरील सर्वसाधारण चर्चेत (General Discussion) काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. सायंकाळी पाच वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन सभागृहात उत्तर देणार असल्याने राजकीय वातावरण आणखी रंगण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, काँग्रेसने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव (No-Confidence Motion) दाखल केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रारंभिक मसुद्यातील तारखेची चूक लक्षात आल्यानंतर जयराम रमेश यांनी सुधारित नोटीस पुन्हा सादर केली. संसदीय परंपरेचा सन्मान राखण्यासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या नोटिशीवर स्वाक्षरी केली नसल्याचे पक्षसूत्रांनी स्पष्ट केले. यापूर्वी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला गेला तेव्हाही मल्लिकार्जुन खर्गे आणि सोनिया गांधी यांनी स्वाक्षरी टाळली होती.

चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी भारताच्या डेटा सुरक्षेचा (Data Security) मुद्दा अग्रक्रमाने उपस्थित केला. “भारताकडे जगातील सर्वाधिक मौल्यवान डेटा आहे. अमेरिका (United States, US) आणि चीन या दोन्ही महासत्तांची नजर आपल्या डेटावर आहे,” असे ते म्हणाले. बांगलादेशच्या वस्त्रोद्योगाला Zero Tariff मिळत असताना भारताच्या Textile Industry ला फटका बसल्याचा आरोप त्यांनी केला. “अमेरिका टॅरिफ वाढवते, मग आपल्याला काय मिळाले?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा: HSRP Number Plate Deadline: पुणेकरांनो सावधान! 15 फेब्रुवारीपासून विना-HSRP वाहनांवर कारवाईचा बडगा; 'इतका' भरवा लागणार दंड

ऊर्जा सुरक्षेच्या (Energy Security) मुद्द्यावर बोलताना राहुल गांधी म्हणाले, “आता अमेरिका ठरवणार का की आपण तेल कुठून खरेदी करायचे? असा निर्णय भारताच्या कोणत्याही पंतप्रधानांनी कधी घेतलेला नाही.” ऊर्जा आणि वित्तीय क्षेत्राचे (Financial Sector) राजकारण होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. “सरकारने भारत विकला आहे,” असा कठोर शब्दांत त्यांनी निषेध नोंदवला.

कृषी क्षेत्राविषयी बोलताना त्यांनी मका, सोयाबीन, लाल ज्वारी आणि कापूस या पिकांबाबत सरकारने अमेरिकन शेतकऱ्यांना अनुकूल धोरण स्वीकारल्याचा आरोप केला. “आपण अमेरिकेतील शेतकऱ्यांचे संरक्षण करता, तर आम्हालाही आपल्या शेतकऱ्यांचे संरक्षण करण्याचा अधिकार आहे,” असे ते म्हणाले. भारताची लोकसंख्या ही ताकद आहे, आव्हान नाही, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख करताना राहुल गांधी म्हणाले की, भारताशी समानतेच्या नात्याने संवाद व्हायला हवा. “भारतीय डेटा आमची ताकद आहे. आम्ही कुणाचे नोकर नाही. आमच्या ऊर्जा आणि कृषी सुरक्षेबाबत तडजोड होणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्यांमुळे लोकसभेतील चर्चा अधिकच धारदार झाली असून, अर्थमंत्र्यांच्या उत्तराकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: Purandar Airport: पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! 6 हजार कोटींच्या कर्जाला ग्रीन सिग्नल, भूसंपादनाला सुरुवात


सम्बन्धित सामग्री