अहमदाबाद: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर देशभरात एकच खळबळ उडाली आहे. या भीषण दुर्घटनेत अनेक प्रवाशांचा जीव धोक्यात आला असून, यातून बचावलेल्यांचे अनुभव अंगावर काटा आणणारे आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे; ड्रीमलाईनर विमानांवर डीजीसीएने इतक्या तक्रारी असूनही बंदी का घातली नाही?
राज ठाकरेंनी केलेल्या या वक्तव्यामुळे विमान वाहतूक क्षेत्रातील सुरक्षेच्या बाबतीत मोठं गांभीर्य निर्माण झालं आहे. त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा असा आहे की, 2020 ते 2023 या कालावधीत ड्रीमलाईनर विमानांमध्ये जगभरात वारंवार तांत्रिक बिघाड झाले होते. अमेरिकन कंपनी बोईंगने तयार केलेल्या या ड्रीमलाईनर विमानांच्या सुरक्षिततेवर याआधीही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
हेही वाचा: Ahmedabad Plane Crash: एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत चमत्कारिक बचाव; प्रवासी विश्वशकुमार रमेश यांनी सांगितला जीवघेणा अनुभव
विशेष म्हणजे, एअर इंडियाच नव्हे तर अन्यही अनेक विमान कंपन्यांनी 40 पेक्षा जास्त ड्रीमलाईनर विमानांची ऑर्डर दिली होती. त्यावेळी ही विमाने घेण्यासाठी सरकारकडून आणि विमान वाहतूक नियामक संस्था DGCA (Directorate General of Civil Aviation) कडून परवानगी देण्यात आली होती. यावर ठाकरे म्हणाले, 'जेव्हा जगभरात ही विमाने तांत्रिक बिघाडांमुळे थांबवली जात होती, तेव्हा भारताने मात्र ती सेवेत का ठेवली?'
या अपघातात वापरले गेलेले विमान 28 जानेवारी 2014 रोजी एअर इंडियाच्या सेवेत आलं होतं. त्यानंतरच्या काळात ड्रीमलाईनरविषयी अनेक समस्या समोर येत होत्या. अनेक वेळा इंजिनातील बिघाड, इलेक्ट्रिकल सिस्टिम फेल होणे, केबिन प्रेशरमध्ये अडचणी अशा घटनांमुळे या विमानांविषयी शंका निर्माण झाली होती. तरीही भारत सरकार आणि DGCA ने या विमानांबाबत कठोर निर्णय का घेतला नाही, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा: Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमध्ये एआय-171 विमान कोसळले, 242 प्रवाशांच्या मृत्यूची भीती
राज ठाकरेंचा सवाल असा आहे की, 'जर आपल्याला या विमानांविषयी तक्रारी माहीत होत्या, तर आपण ही विमाने वापरण्याची परवानगी का दिली? DGCA ने कारवाई का केली नाही? केवळ परदेशी बनावटीचे विमान म्हणून त्यावर विश्वास ठेवणं योग्य आहे का?'
या संपूर्ण प्रकरणातील सर्व बाबी अजून स्पष्ट झालेल्या नाहीत. त्यामुळेच अपघाताच्या तपशीलांची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. या दुर्घटनेमागचं नेमकं कारण काय होतं, तांत्रिक बिघाड की मानवी चूक हे सर्व तपासणं महत्त्वाचं ठरणार आहे.