SBI बँकेच्या खातेधारकांसाठी चिंतेची बातमी; खात्यांचा डेटा लीक झाल्याचा हॅकर ग्रुपचा दावा, सायबर फसवणुकीचा धोका

एसबीआयच्या ग्राहकांनी आता कोणत्याही अनोळखी कॉल, लिंक किंवा मेसेजबाबत सावध राहण्याची गरज आहे.

SBI बँकेच्या खातेधारकांसाठी चिंतेची बातमी; खात्यांचा डेटा लीक झाल्याचा हॅकर ग्रुपचा दावा, सायबर फसवणुकीचा धोका
cyber crime

SBI Data Leak: देशातील सर्वांत मोठी सार्वजनिक बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) लाखो ग्राहकांसाठी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘सिरियससिम’ नावाच्या एका हॅकर ग्रुपने एसबीआयच्या 3,75,000 ग्राहकांचा संवेदनशील डेटा आणि 2,722 पीडीएफ फाइल्स हॅक केल्याचा दावा केला आहे. ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ‘सायबरपल्स56’ या सायबर सुरक्षा खात्याने यासंदर्भातील माहिती प्रसिद्ध केली आहे. हा दावा सत्य ठरल्यास लाखो ग्राहकांना सायबर फसवणूक आणि बोगस कर्जाच्या प्रकरणांचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

लीक झालेल्या डेटामध्ये कोणत्या माहितीचा समावेश?
हॅकर ग्रुपने मिळवलेल्या या डेटाबेसमध्ये ग्राहकांच्या अत्यंत खाजगी आणि महत्त्वाच्या कागदपत्रांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. अहवालानुसार लीक झालेल्या माहितीमध्ये
– बँक ग्राहकांची वैयक्तिक माहिती, राहण्याचा पूर्ण पत्ता आणि इतर संपर्क तपशील.
– नवीन खाते उघडण्यासाठी सादर केलेले अर्ज आणि संलग्न केलेली महत्त्वाची कागदपत्रे.
– विविध प्रकारच्या कर्जासाठी केलेले अर्ज आणि त्यासंबंधित संवेदनशील दस्तऐवज.
– सायबर गुन्हेगारांकडून या डेटाचा वापर करून ग्राहकांच्या नावे बनावट कर्ज काढणे किंवा फसवणूक करणे शक्य होऊ शकते.

एसबीआयकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया नाही
या संपूर्ण डेटा लीकच्या दाव्याबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे प्रत्यक्षात हा डेटा लीक झाला आहे की नाही, याबाबत अजूनही स्पष्टता झालेली नाही. मात्र, सायबर सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात असून, या दाव्याची सध्या सखोल पडताळणी केली जात आहे.

सायबर फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी घ्यावयाची काळजी
डेटा लीकच्या या वृत्तानंतर एसबीआयच्या ग्राहकांनी संभाव्य आर्थिक नुकसान टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. ग्राहकांनी या गोष्टींचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
– कोणत्याही अनोळखी क्रमांकावरून येणारे कॉल, संशयास्पद लिंक्स किंवा मेसेजवर चुकूनही क्लिक करू नका.
– अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून आपली वैयक्तिक किंवा बँकेशी संबंधित कोणतीही माहिती शेअर करू नका.
– आपला एटीएम पिन, पासवर्ड किंवा ओटीपी (OTP) कोणाशीही शेअर करू नका.
– खात्यावर कोणताही अनधिकृत किंवा संशयास्पद व्यवहार आढळल्यास त्वरित बँकेशी संपर्क साधून तक्रार नोंदवा.

सतर्कता आणि सुरक्षितता हेच उत्तर
जोपर्यंत बँक किंवा प्रशासनाकडून याविषयी अधिकृत स्पष्टीकरण येत नाही, तोपर्यंत ग्राहकांनी घाबरून न जाता केवळ सतर्क राहणे आवश्यक आहे. डिजिटल बँकिंग वापरताना योग्य काळजी घेतल्यास संभाव्य धोके आणि आर्थिक फसवणूक सहज टाळता येऊ शकते.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number