दिल्लीहून चेन्नईसाठी उड्डाण केलेल्या इंडिगोच्या विमानात अचानक एका वैयक्तिक इलेक्ट्रॉनिक उपकरणातून धूर निघू लागल्याने रविवारी विमानाचे हैदराबाद विमानतळावर आपत्कालीन लँडिंग (Emergency Landing) करण्यात आले. विमानाच्या ‘ओव्हरहेड बिन’मध्ये (डोक्यावरील सामानाच्या कप्प्यात) ठेवलेल्या उपकरणातून हा धूर येत असल्याचे केबिन क्रूच्या लक्षात आले. सुदैवाने, केबिन कर्मचाऱ्यांनी दाखवलेले प्रसंगावधान आणि वैमानिकाच्या तत्परतेमुळे विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित राहिले असून एक मोठी दुर्घटना टळली आहे.
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षित लँडिंग
इंडिगोने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, 11 ऑक्टोबर 2026 रोजी इंडिगोचे विमान क्रमांक 6E 6115 दिल्लीहून चेन्नईसाठी रवाना झाले होते. उड्डाणादरम्यान प्रवाशांच्या सामानाच्या कप्प्यातून अचानक धूर येत असल्याचे दिसताच केबिन कर्मचाऱ्यांनी निर्धारित सुरक्षा नियमावलीचे पालन करत परिस्थितीवर तात्काळ नियंत्रण मिळवले. प्रवाशांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून वैमानिकांनी विमान त्वरित हैदराबादच्या दिशेने वळवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हे विमान हैदराबाद येथील ‘राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर’ अत्यंत सुरक्षितपणे उतरवण्यात आले. विमान कंपनीने दिलेल्या निवेदनानुसार सर्व प्रवासी आणि कर्मचारी पूर्णपणे सुरक्षित आहेत.
पाटणा ते लखनौ उड्डाणादरम्यान विमानावर वीज कोसळली
याच दरम्यान, देशातील अन्य दोन हवाई वाहतूक घटनाही समोर आल्या आहेत. पाटणाहून लखनौकडे जाणाऱ्या इंडिगोच्या एका विमानावर अचानक आकाशातील वीज पडल्याची घटना घडली. यामुळे विमानाचा पुढचा भाग (नोझ सेक्शन) काही प्रमाणात क्षतिग्रस्त झाला. ही घटना घडली तेव्हा हे विमान सुमारे 17,000 फूट उंचीवर उड्डाण करत होते. तरीही वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमान लखनौ विमानतळावर सुरक्षितपणे उतरवले. या विमानात एकूण 104 प्रवासी आणि 6 कर्मचारी प्रवास करत होते; सर्वजण सुखरूप असून हे विमान नियोजित वेळेच्या 8 मिनिटे आधीच लखनौला पोहोचले.
हेही वाचा – SIR वरून वाद सुरू असतानाच निवडणूक आयोगात खळबळ, रातोरात घेतला मोठा निर्णय
रुद्रप्रयाग येथे हेलिकॉप्टरचे खबरदारी म्हणून आपत्कालीन लँडिंग
दुसऱ्या एका घटनेत, उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यात खराब हवामानामुळे एका हेलिकॉप्टरला खबरदारीचा उपाय म्हणून अचानक लँडिंग करावे लागले. ‘हिमालयन सर्व्हिसेस’द्वारे चालवले जाणारे हे हेलिकॉप्टर उत्तरकाशीतील झाला येथून सरसी हेलिपॅडकडे जात असताना अचानक हवामान बिघडले. प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत वैमानिकाने हेलिकॉप्टर अगस्त्यमुनी क्रीडा मैदानावर सुरक्षितपणे उतरवले. या हेलिकॉप्टरमध्ये कर्मचाऱ्यांसह एकूण 6 जण सवार होते आणि प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सर्वजण सुरक्षित आहेत.