Sunday, January 18, 2026 07:46:44 AM

IndiGo Crisis: 'दोष FDTL नियमांचा नाही तर...'; केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्याने राज्यसभेत सांगितलं इंडिगोच्या संकटामागील खरं कारण

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मोठ्या ऑपरेशनल अडथळ्यांवर केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू किंजरापू यांनी सोमवारी राज्यसभेत सविस्तर माहिती दिली.

indigo crisis दोष fdtl नियमांचा नाही तर केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्याने राज्यसभेत सांगितलं इंडिगोच्या संकटामागील खरं कारण

IndiGo Crisis: इंडिगो एअरलाइन्समध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मोठ्या ऑपरेशनल अडथळ्यांवर केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू किंजरापू यांनी सोमवारी राज्यसभेत सविस्तर माहिती दिली. सात दिवसांपासून उड्डाणे रद्द होत राहिल्याने देशभरातील प्रवाशांचे हाल होत असताना, या संकटाचे मूळ नवीन वैमानिक ड्युटी नियमांमध्ये (FDTL) नसून इंडिगोच्या व्यवस्थापनातील गंभीर उणिवांमध्ये असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

FDTL नियमांना दोष नाही; रोस्टर व्यवस्थापन कोलमडले 

मंत्र्यांनी ठाम शब्दांत सांगितले की, इंडिगोने पायलट आणि क्रू रोस्टरचे योग्य नियोजन न केल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली. एफडीटीएल नियमांचे काटेकोर पालन होईल आणि कुठेही निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. नायडू यांनी सांगितलं की, 1 डिसेंबर रोजी मंत्रालय आणि इंडिगो व्यवस्थापनामध्ये एफडीटीएलसंबंधी बैठक झाली होती. त्या वेळी एअरलाइन्सकडून काही शंका उपस्थित करण्यात आल्या आणि मंत्रालयाने तत्काळ स्पष्टीकरणही दिले. त्यावेळी कोणताही व्यत्यय नव्हता. पण 3 डिसेंबरला अचानक अडचणी वाढल्या आणि मंत्रालयाला तात्काळ हस्तक्षेप करावा लागला, असेही त्यांनी नमूद केले.  

हेही वाचा - IndiGo Flights Cancellations: इंडिगोचे उड्डाणे रद्द करण्याचे सत्र सुरूच; सातव्या दिवशी 400 हून अधिक फ्लाईट रद्द 

प्रवाशांच्या गैरसोयीवर संताप  

प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास झाला याची नोंद घेत त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, ही परिस्थिती हलक्यात घेतलेली नाही. चौकशी सुरू असून केवळ या प्रकरणापुरते नव्हे तर संपूर्ण विमान वाहतूक क्षेत्रासाठी आदर्श ठरेल अशी कारवाई करण्यात येईल. भविष्यात नियम मोडल्यास कडक पावले उचलली जातील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

हेही वाचा -   Vande Mataram Debate: 'मुस्लिम लीगच्या दबावाखाली काँग्रेसने वंदे मातरमचे तुकडे केले’; लोकसभेत पंतप्रधान मोदींचा नेहरूंवर हल्लाबोल

उड्डाणे रद्द होण्याचे सत्र अद्याप सुरूच  

संकटग्रस्त इंडिगो एअरलाइन्सच्या सततच्या कामकाजातील व्यत्ययामुळे सोमवारी दिल्ली आणि बेंगळुरू विमानतळांवरून 250 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. हे संकट आता सलग सातव्या दिवशीही कायम आहे. दिल्ली विमानतळावरून एकूण 134 उड्डाणे रद्द करण्यात आली. दरम्यान, बंगळुरू विमानतळावरून 117 उड्डाणे रद्द करण्यात आली. तथापी, सलग सातव्या दिवशी मोठ्या प्रमाणात फ्लाइट रद्द झाल्याने प्रवाशांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे.


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या