अगरतळा (त्रिपुरा): भारतीय अंडर-19 संघात भारताचे प्रतिनिधित्व करणारे आणि त्रिपुराचे माजी सर्वांगीण खेळाडू राजेश बानिक यांचे वाहन अपघातात निधन झाले आहे. ते 40 वर्षांचे होते. हा अपघात पश्चिम त्रिपुरातील आनंदनगर परिसरात शुक्रवारी रात्री झाला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यांच्या निधनाने राज्यातील क्रिकेटप्रेमींमध्ये आणि सहकाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. बानिक यांच्या पश्चात त्यांचे वडील, आई आणि भाऊ असा परिवार आहे.
2002-03 मध्ये रणजी पदार्पण, त्रिपुराचे अग्रगण्य क्रिकेटपटू राजेश बानिक यांनी 2002-03 हंगामात रणजी ट्रॉफी स्पर्धेत पदार्पण केले आणि लवकरच राज्यातील आघाडीचे खेळाडू म्हणून आपली ओळख निर्माण केली. ते त्रिपुराच्या क्रिकेटमधील एक विश्वासार्ह सर्वांगीण खेळाडू होते. खेळातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी राज्याच्या अंडर-16 संघासाठी निवड समिती सदस्य (सिलेक्टर) म्हणून काम केले. त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने त्रिपुरा क्रिकेटला मोठा धक्का बसला आहे.
त्रिपुरा क्रिकेट असोसिएशनकडून श्रद्धांजली
त्रिपुरा क्रिकेट असोसिएशन (TCA) ने शनिवारी आपल्या मुख्यालयात बानिक यांच्या स्मृतीला श्रद्धांजली वाहिली. असोसिएशनचे सचिव सुब्रता दे यांनी म्हटले, “आपण एक प्रतिभावान क्रिकेटपटू आणि अंडर-16 संघाचा सेलेक्टर गमावला आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.”
हेही वाचा: Gold Limit for Bank Locker : आयकर नियमांनुसार बँकेच्या लॉकरमध्ये कोणाला किती 'ग्रॅम' सोने ठेवता येते?
तरुण प्रतिभा ओळखण्यात कुशल होते बानिक
त्रिपुरा स्पोर्ट्स जर्नलिस्ट्स क्लबचे सचिव अनिर्बाण देब यांनी सांगितले की, “राजेश बानिक हे राज्याने दिलेले सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडरपैकी एक होते. मात्र त्यांच्या खरी ताकद होती नव्या पिढीतील खेळाडूंची प्रतिभा ओळखण्यात. त्यामुळेच त्यांची अंडर-16 संघासाठी सिलेक्टर म्हणून नियुक्ती झाली होती.”
प्रभावी खेळाडू म्हणून बानिक यांचा प्रवास
12 डिसेंबर 1984 रोजी अगरतळा येथे जन्मलेले बानिक यांनी 2000-01 हंगामात पहिल्या श्रेणीच्या क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यांचा शेवटचा सामना 2018 मध्ये ओडिशाविरुद्ध झाला, ज्यात त्यांनी 3 बळी घेत उल्लेखनीय कामगिरी केली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी 42 सामने खेळले, 1,469 धावा केल्या आणि 6 अर्धशतकं झळकावली. या स्वरूपात त्यांनी 2 विकेट्स घेतल्या. लिस्ट-ए स्वरूपात त्यांनी 24 सामने खेळले, 378 धावा केल्या आणि सर्वोच्च स्कोर 101 नाबाद राहिला. या प्रकारात त्यांनी 8 विकेट्स घेतल्या. तर टी-20 स्वरूपात त्यांनी 18 डावांतून 203 धावा केल्या आणि 1 विकेट घेतली.
खेळानंतर तरुणांना दिशा देण्याचं काम सुरू ठेवलं
स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर बानिक यांनी राज्यातील नव्या पिढीतील खेळाडू घडवण्यासाठी कार्य सुरू ठेवले. त्यांनी त्रिपुरातील तरुण खेळाडूंच्या निवडीसाठी आणि प्रशिक्षणासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. 1 नोव्हेंबर रोजी त्रिपुरा क्रिकेट असोसिएशनतर्फे त्यांच्या स्मृतीला आदरांजली अर्पण करण्यात आली. राजेश बानिक यांचे नाव त्रिपुराच्या क्रिकेट इतिहासात मेहनती, प्रामाणिक आणि समर्पित खेळाडू म्हणून सदैव लक्षात राहील.
हेही वाचा: Winter Care: हिवाळ्यात तळपायाला भेगा पडतात? 'हा' सोपा उपाय करून बघा आणि व्हा त्रासातून मुक्त