Thursday, July 17, 2025 01:42:06 AM

'अत्यंत वाईट सेवा...'; सुप्रिया सुळेंची एअर इंडियाबद्दल विमान वाहतूक मंत्र्यांकडे तक्रार

सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणाची तक्रार भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांच्याकडेही केली आहे.

अत्यंत वाईट सेवा सुप्रिया सुळेंची एअर इंडियाबद्दल विमान वाहतूक मंत्र्यांकडे तक्रार
Edited Image

नवी दिल्ली: गुजरातमधील अहमदाबाद येथे 12 जून रोजी एअर इंडियाचे विमान कोसळले. या घटनेत एक प्रवासी वगळता विमानातील सर्वांचा मृत्यू झाला. या घटनेपासून एअर इंडियाच्या अनेक उड्डाणे सतत रद्द किंवा उशिरा होत आहेत. एअरलाइन्सच्या विमानांमध्येही तांत्रिक समस्या आढळून आल्या आहेत. दरम्यान, लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत एअर इंडियाने प्रवास करताना अशीच एक घटना घडली आहे, ज्यामुळे त्यांनी सोशल मीडियावर एअर इंडियाबद्दल संताप व्यक्त केला आहे. 

सुप्रिया सुळेंनी एअर इंडियाबद्दल विमान वाहतूक मंत्र्यांकडे केली तक्रार -  

सुप्रिया सुळे दिल्लीहून पुण्याला एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करत होत्या. मात्र, विमानाला बराच विलंब झाला. या घटनेबद्दल सुळे यांनी एक्स वर पोस्ट करत म्हटलं की, 'दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाईट AI 2971 ने प्रवास करत आहे. विमानाला 3 तासांपेक्षा जास्त उशीर झाला आहे. कोणताही स्पष्ट संपर्क नाही, कोणतेही अपडेट नाहीत, मदत नाही आणि खूप वाईट सेवा आहे. एअर इंडियासाठी असा विलंब आणि गैरव्यवस्थापन सामान्य झाले आहे. प्रवासी अडकलेले आणि असहाय्य राहतात. हे अस्वीकार्य आहे.' 

हेही वाचा - अमेरिकेहून येणाऱ्या एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणाची तक्रार भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांच्याकडेही केली आहे. त्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची आणि विमान कंपनीला जबाबदार धरण्याची मागणी केली आहे. 

विमान वाहतूक मंत्र्यांनी दिलं उत्तर - 

सुप्रिया सुळे यांनी केलेल्या या तक्रारीला केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी उत्तर दिले असून त्यांनी म्हटलं आहे की, 'सुप्रिया सुळे जी, मी विमान कंपनी आणि विमानतळ अधिकाऱ्यांशी बोललो आहे. त्यांना सर्व बाधित प्रवाशांच्या चिंता त्वरित सोडवण्यास सांगितले आहे.' 

हेही वाचा - एअर इंडियाच्या मागे लागली साडेसाती? विमानात पुन्हा बिघाड, रांचीला जाणारे विमान दिल्लीला परतले

याशिवाय, एअर इंडियाने देखील सुप्रिया सुळे यांच्या पोस्टला उत्तर दिलं आहे. कंपनीने म्हटलं आहे की, 'प्रिय मॅडम, दिल्लीतील प्रतिकूल हवामानामुळे, विमान वाहतूकीवर मोठा परिणाम झाला आहे. यामध्ये अनेक विमानांचे वळवणे आणि विमान रद्द करणे समाविष्ट आहे. कृपया खात्री बाळगा की आमचे पथक सर्व प्रभावित ग्राहकांना मदत करण्यात पूर्णपणे गुंतलेले आहेत. झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही मनापासून दिलगीर आहोत.' 


सम्बन्धित सामग्री