Monday, May 11, 2026 12:05:46 PM

BJP TMC Clash: पंतप्रधानांच्या सभेपूर्वीच रणकंदन! पश्चिम बंगालमध्ये भाजप-तृणमूल कार्यकर्ते भिडले; दगडफेक आणि तुफान हाणामारी

दगडफेक आणि मारहाणीत माजी खासदार अर्जुन सिंह यांच्यावर हल्ल्याचा आरोप असून, नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर तणाव वाढला आहे.

bjp tmc clash पंतप्रधानांच्या सभेपूर्वीच रणकंदन पश्चिम बंगालमध्ये भाजप-तृणमूल कार्यकर्ते भिडले दगडफेक आणि तुफान हाणामारी

पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यात काल रात्री भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र झटापट झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बैरकपूर परिसरातील जगदल विधानसभा मतदारसंघात घडली. विशेष म्हणजे, आज (27 एप्रिल 2026) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेगा सभेच्या पार्श्वभूमीवर ही हिंसक चकमक झाली.

दगडफेकीसह जोरदार मारामारी

ही झटापट जगदल पोलीस ठाण्यासमोर घडली. भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांमध्ये जोरदार धक्काबुक्की आणि मारामारी झाली. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर दगडफेक करण्यात आली, ज्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

माजी खासदार अर्जुन सिंह यांच्यावर हल्ल्याचा आरोप

या हिंसक घटनेत बैरकपूरचे माजी खासदार अर्जुन सिंह यांच्यावरही हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी त्यांना गाडीतून खाली उतरताच वेढा घालण्याचा आणि ओढण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा: Digital Credit Card : आता खात्यात बॅलन्स नसला तरी होणार पेमेंट; ही बँक देत आहे डिजिटल क्रेडिट कार्डवरून उधारीची सुविधा

वादाची ठिणगी कशी पडली?

माहितीनुसार, जगदल विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार राजेश कुमार रविवारी (26 एप्रिल 2026) रात्री सुमारे 10:30 वाजता तक्रारीसंदर्भातील कागदपत्रे घेण्यासाठी जगदल पोलीस ठाण्यात गेले होते. त्याचवेळी तृणमूलचे स्थानिक नेते मनोज पांडे, सौरभ सिंह आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची टीमही अचानक तेथे पोहोचली. ही माहिती मिळताच अर्जुन सिंह देखील तातडीने पोलीस ठाण्यात दाखल झाले.

पोलीस ठाण्यातच हाणामारी

अर्जुन सिंह गाडीतून उतरताच दोन्ही गटांमध्ये वाद झाला आणि त्याचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. काही वेळासाठी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचेही सांगितले जाते. आरोपानुसार, दोन्ही पक्षांमध्ये पोलीस ठाण्याच्या परिसरातच नव्हे तर आतही धक्काबुक्की झाली.

पोलिसांचा हस्तक्षेप, परिस्थिती नियंत्रणात

जगदल पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रयत्नांनंतर परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या दोन्ही गटांना त्या परिसरातून हटवण्यात आले असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिसरात तणाव कायम असला तरी स्थिती नियंत्रणात असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. 

हेही वाचा: Bageshwar Baba Apologized: शिवरायांबद्दलच्या 'त्या' वक्तव्यावर बागेश्वर बाबांचा माफीनामा; नेमकं काय म्हणाले?


सम्बन्धित सामग्री