Divorce Couple Survey: पती-पत्नीतील किरकोळ वाद अनेकदा मोठ्या संघर्षात बदलतात आणि शेवटी प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचतं. देशात अशा असंख्य जोडप्यांचे संसार तुटले आहेत. मात्र अलीकडच्या एका सर्वेक्षणातून उघड झालेली आकडेवारी धक्कादायक आहे. घटस्फोटानंतर तब्बल 42 टक्के पुरुषांना कर्ज घ्यावं लागलं असल्याचं स्पष्ट झालं आहे. आर्थिक सल्लागार कंपनी ‘वन फायनान्स अॅडव्हायझरी’ने केलेल्या या सर्वेक्षणात टियर-1 आणि टियर-2 शहरांतील 1,258 लोकांचा समावेश करण्यात आला होता. यात घटस्फोटित तसेच घटस्फोटासाठी अर्ज केलेले दोन्ही गट सहभागी होते. निष्कर्षानुसार, घटस्फोटाशी संबंधित खर्चासाठी 49 टक्के पुरुषांनी आणि 19 टक्के महिलांनी 5 लाखांपेक्षा जास्त रक्कम खर्च केल्याचं आढळलं.
पैशांवरून वाढले वाद
लग्न टिकवण्यात पैसा हा मोठा अडसर ठरतो, हे या अहवालातून स्पष्ट झालं. सहभागींपैकी 67 टक्के लोकांनी पैशांवरून सतत वाद होत असल्याची कबुली दिली. तर 43 टक्के लोकांनी आर्थिक वाद किंवा उत्पन्नातील असमानता हाच घटस्फोटाचा मुख्य कारणीभूत घटक असल्याचं मान्य केलं. याशिवाय, लग्नाच्या वेळी 56 टक्के महिला आपल्या पतींपेक्षा कमी कमवत होत्या, तर फक्त 2 टक्के महिलांचं उत्पन्न पतींपेक्षा जास्त होतं.
हेही वाचा - Weird Divorce Case : या कारणावरूनही होऊ शकतो घटस्फोट?; या जोडप्यासोबत जे झालं ते ऐकून व्हाल थक्क
तज्ज्ञांचे मत
या सर्वेक्षणाबद्दल कंपनीचे सह-संस्थापक आणि सीईओ केवल भानुशाली म्हणाले, पती-पत्नीमधील आर्थिक असमानता हे घटस्फोटाचं महत्त्वाचं कारण आहे. वेगळं होण्याचा खर्च मानसिक ताण वाढवतो आणि जीवनात अस्थिरता निर्माण करतो. त्यामुळे भावनिक तयारीसोबतच आर्थिक तयारीदेखील तितकीच गरजेची आहे.
हेही वाचा - Condom Failure Cases: कंडोम वापरल्यानंतरही गर्भधारणा! ग्राहकांनी कंपनीविरुद्ध दाखल केला खटला
घटस्फोटानंतर पुरुषांवर कर्जाचा डोंगर
घटस्फोट झाल्यानंतर पुरुषांच्या वार्षिक उत्पन्नातील 38 टक्के हिस्सा पोटगीसाठी खर्च होतो, असं निष्पन्न झालं. इतकंच नव्हे तर 29 टक्के पुरुष घटस्फोटानंतर आर्थिकदृष्ट्या निगेटिव्ह नेटवर्थमध्ये गेले. पोटगी आणि इतर खर्च भागवण्यासाठी 42 टक्के पुरुषांनी कर्ज घेतलं, तर 46 टक्के महिलांनी आपल्या करिअरला ब्रेक दिला. तज्ज्ञांच्या मते, विवाहाआधीच जोडीदारांनी कर्ज, बचत, उत्पन्नातील स्थिरता आणि भविष्यातील जबाबदाऱ्या यावर मोकळेपणाने चर्चा करावी. आर्थिक पारदर्शकतेमुळे नातेसंबंध अधिक टिकाऊ होऊ शकतात आणि भविष्यातील संघर्ष टाळता येतात.