इराण: पश्चिम आशियातील तणाव कमी होताच जागतिक बाजारात मोठा परिणाम दिसून आला असून, कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांच्या युद्धविरामावर सहमती झाल्यानंतर ऊर्जा बाजाराला मोठा दिलासा मिळाला आहे.
या कराराचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुझ हा अत्यंत महत्त्वाचा जलमार्ग तात्पुरता खुला करण्यास सहमती दर्शवली आहे. या मार्गातून जगातील सुमारे 20 टक्के कच्चे तेल आणि द्रवरूप नैसर्गिक वायू (LNG) वाहतूक होते. त्यामुळे हा मार्ग पुन्हा सुरू झाल्याने जागतिक पुरवठा साखळीला मोठा आधार मिळाला आहे.
या घडामोडीनंतर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली. ब्रेंट क्रूड सुमारे 15.19 टक्क्यांनी घसरून 92.67 डॉलर प्रति बॅरलवर आला, तर वेस्ट टेकसास क्रूड जवळपास 15.02 टक्क्यांनी घसरत 96.03 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले. काही दिवसांपूर्वीच युद्धामुळे या किमतींमध्ये मोठी वाढ झाली होती, त्यामुळे ही घसरण गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची मानली जात आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील हल्ले दोन आठवड्यांसाठी स्थगित करण्याची घोषणा केली असून, हा निर्णय इराणने जलमार्ग सुरक्षित आणि तात्काळ खुला करण्याच्या अटीवर आधारित असल्याचे स्पष्ट केले. त्याचवेळी इराणचे परराष्ट्रमंत्री सैयद अब्बास अराघची यांनीही जहाजांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक समन्वय साधला जाईल, असे सांगितले.
Statement on behalf of the Supreme National Security Council of the Islamic Republic of Iran: pic.twitter.com/cEtBNCLnWT — Seyed Abbas Araghchi (@araghchi) April 7, 2026
युद्धामुळे या मार्गावरील वाहतूक जवळपास ठप्प झाली होती, ज्याचा परिणाम जागतिक ऊर्जा बाजारावर झाला. अंदाजानुसार, एप्रिल महिन्यात मध्यपूर्वेतील प्रमुख उत्पादकांकडून दररोज नऊ दशलक्ष बॅरलपेक्षा जास्त तेलपुरवठा अडथळ्यात आला होता. त्यामुळे किमतींमध्ये प्रचंड चढ-उतार पाहायला मिळाले.
दरम्यान, या युद्धविरामासाठी पाकिस्तानने मध्यस्थीची भूमिका बजावल्याचा दावा केला असून, हा करार इस्रायल आणि लेबनॉनमधील संघर्षावरही लागू होईल, असे म्हटले जात आहे. एकूणच, या युद्धविरामामुळे जागतिक ऊर्जा बाजाराला तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी पुढील परिस्थिती कशी राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.