राजस्थानमधील चुरू जिल्ह्यातून अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. सादुलपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दादरेवा गावाजवळ एका भरधाव कारची आणि समोर चाललेल्या ट्रकची अत्यंत जोरदार धडक झाली. या भीषण रस्ते अपघातात कारमधील एकाच कुटुंबातील 5 सदस्यांसह चालक अशा एकूण 6 जणांचा जागीच व उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. हे सर्वजण चुरू जिल्ह्यातील तारा नगर येथील सोमसीसर गावचे रहिवासी असून, ते धार्मिक दर्शनासाठी गोगामेडी येथील प्रसिद्ध मंदिरात जात असताना हा भीषण अपघात घडला. या घटनेमुळे संपूर्ण सोमसीसर गावावर आणि परिसरात मातमाचे सावट पसरले आहे.
7 महिन्यांच्या चिमुकल्याचाही उपचारादरम्यान मृत्यू
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सोमसीसर गावातून हे कुटुंब अत्यंत आनंदाने देवदर्शनासाठी निघाले होते. मात्र, न्यागली गावाजवळ पोहोचताच समोर चाललेल्या ट्रक चालकाने अचानक व निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे भरधाव कार थेट ट्रकवर जाऊन आदळली. अपघाताचा आवाज इतका प्रचंड होता की, आसपासच्या स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. या दुर्घटनेत कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला होता. अपघातात 5 जणांचा घटनास्थळीच करुण अंत झाला, तर गंभीर जखमी झालेल्या 7 महिन्यांच्या एका चिमुकल्या बाळाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान त्याचीही प्राणज्योत मालवली.
हेही वाचा – कुत्र्यांच्या भुंकण्याने घाबरून पळाली, अन्…; 3 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
ट्रक चालक घटनास्थळावरून फरार
अपघाताची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक रिछपाल सिंग आणि स्टेशन हाऊस ऑफिसर (SHO) राजेश कुमार सिहाग यांनी पोलीस पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने कारमधून मृतदेह बाहेर काढून ते सरकारी उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागारात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. दुर्घटनेनंतर आरोपी ट्रक चालक आपले वाहन सोडून घटनास्थळावरून पसार झाला असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. यापूर्वी शुक्रवारीही जयपूरमधील जमवारामगड येथे कार खड्ड्यात उलटून 4 तरुणांचा मृत्यू झाला होता. चुरूतील या घटनेमुळे राजस्थानमध्ये रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.